मुंबई-दोन दिवसांपूर्वी घाटकोपरच्या झोपडपट्टीत एका 25 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. याच झोपडपट्टीत राहणाऱ्या 68 वर्षांच्या स्त्रीला त्याअगोदर लागण झाली होती. ती एका कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीकडे घरकाम करणारी आहे. आणखी एक पॉझिटिव्ह केस सापडली कलिनाच्या झोपडपट्टी भागात. एका 37 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. जेमतेम 8 बाय 10 फुटांच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या वस्तीत कोरोनाव्हायरस पोहोचल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचं काम किती बिकट झालं आहे, याची बातमी मुंबई मिररने दिली आहे.
मुंबईच्या चाळींमध्ये एक किंवा दोन खोल्यांमध्ये संसार मांडून सात-आठ जणसुद्धा राहतात. बहुधा अशा चाळींतून कॉमन स्वच्छतागृह आणि संडास असतात. त्यामुळे स्वच्छतागृह वापरण्यासाठी, भाजी आणण्यासाठी लोक घर सोडून खाली येतातच. एवढाशा खोलीत होम क्वारंटाइन किंवा विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं अशक्य आहे. या चारही रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आलं आहे आणि त्यांच्या संपर्कातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा महापालिकेचे आरोग्यसेवक प्रयत्न करत आहेत. पण या पॉझिटिव्ह केसेस सापडण्यापूर्वी त्यांचा कित्येक लोकांशी संपर्क झालेला असू शकतो.