भारत बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! : काँग्रेसचे पुणेकरांना आवाहन
पुणे-पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने अवास्तव आणि अन्याय्य दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने उद्या १० सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे व आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.
काँग्रेसभवन, पुणे येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्याच्या भारत बंदबाबत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, हमाल पंचायत , शैक्षणिक संस्था , सराफ व्यावसायिक, पेट्रोल डीलर असोसिएशन आदींना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
दुपारी १२ वाजता ट्रायलक हॉटेल, पुणे कॅम्प येथे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते , पदाधिकारी जमून कॅम्पमधील विविध व्यापारी संघटनांना व दुकानदारांना बंद पाळण्याचे आवाहन करणार आहेत.
या बैठकीस माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता रजपूत, अजित दरेकर, रमेश अय्यर, संगिता तिवारी, चैतन्य पुरंदरे, सचिन आडेकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापारी बांधवांचे, सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची संपूर्ण दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ते शांततापूर्ण मार्गाने यशस्वी करावे असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.