दृष्टीहिन मुलांनी लुटला हास्योत्सवाचा मनमुराद आनंद
जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजन ; कोरेगाव पार्क येथील अंध-अपंग शाळेत विशेष कार्यक्रम
पुणे : आयुष्यात येणा-या प्रत्येक आव्हानाचा सामना करीत अंधारात चाचपडत प्रकाशवाटा शोधणा-या चिमुकल्यांना आनंदाचे दोन क्षण हास्योत्सवाने मिळवून दिले. हास्याचे विविध प्रकार समजून घेत त्याप्रमाणे हास्ययोगाचा आनंद घेणा-या दृष्टीहिन मुलांच्या चेह-यावर यावेळी निरागस हसू उमलत होते. जागतिक अपंग दिनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात विशेष मुलांसह सामान्यांनीही उत्साहाने सहभाग घेत, आम्ही तुमच्यातीलच एक आहोत, असे सांगत एकोप्याचा संदेशही दिला.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात या कार्यक्रमाचे आयोजन कोरेगाव पार्क येथील अंध-अपंग शाळेमध्ये करण्यात आले. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, चंद्रशेखर कपोते, प्रशांत सुरसे, संगीता तिवारी, अॅड. सुरेश बोराटे, चित्रा माळवे, शलाका मरोड, अॅड.शाबीर खान, निलेश बोराटे, शिलाल रतनगिरी, चेतन आगरवाल, सन्मितसिंग चौधरी, आदी उपस्थित होते. संस्थेतील मुलांना फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
मोहन जोशी म्हणाले, सेवा, कर्तव्य, त्याग या तिन्ही शब्दांचे अर्थ आपल्या अंगी बाणवत संपूर्ण आयुष्यात आपण समाजासाठी काम केले पाहिजे. दृष्टीहिन मुले ही कोणाचा तरी आधार घेऊन आयुष्यात पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची साथ देत त्यांच्या आयुष्यात आनंदाने क्षण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांनी अशा मुलांसोबत संपूर्ण वर्षातील किमान एक दिवस देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर, पीयुसी चाचणी शिबीर अशा अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले.