पुणे- केवळ तुमच्या मिळकती आहेत म्हणून मग तुम्ही गरीब नाहीत असा अर्थ लाऊन या योजनेचा लाभ घेतल्याबद्दल महापालिकेने 4000 मध्यमवर्गीयांना नोटीसा बजावल्या आहेत . हि बाब निषेधार्ह असून शहरातील मध्यम वर्गीयांना या योजपासून वंचित ठेवण्या करिता व ही योजना गुंडाळण्याकरिता प्रशासन व सत्ताधारी ह्या नोटीसा पाठवत आहेत असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी केला आहे.. 8 दिवसात हा प्रकार थांबवावा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने आंदोलन करून धडा शिकवेल असा इशारा हि त्यांनी दिला आहे.
नगरसेवक धनवडे या संदर्भात म्हणाले कि,’मागील 6 महिन्यात पुणे शहरातील ज्या 4000 मध्यमवर्गीय नागरिकांनी शहरी गरीब योजनेचा लाभ घेतला त्यांना मिळकत कर भरल्याने या योजनेचा लाभ का घेण्यात आला अशा नोटीस बजावण्यात आल्या असून या प्रकरणाचा शिवसेना निषेध व्यक्त करते व आयुक्तांना सवाल करते की मिळकत करावरून आपण कसे ठरवू शकतो की यांचे उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी आहे . आपली ही योजना फक्त 1 लाख पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला देणाऱ्या नागरिकांना या योजनेचा आपण लाभ देतो आपणास हरकत असेल तर जिल्हाधिकारी यांना या लोकांना 1 लाख पेक्षा कमी उत्पन्न का आहे व का दाखला दिला याचा खुलासा मागवावा . अनेकांची आपली घरे आहेत , पण त्यांना जेवण आहे कि नाही ? हे कोणी पाहिलेय ? रोजगार नाही , किंवा रोजगार बंद झालाय , व्यवसाय बंद पडलेत , दिवाळे निघालेत अशा स्थितीत केंद्र सरकारकडून महागाईचा आगडोंब उसळविला जातो आहे . या साऱ्या वातावरणात होरपळून निघत असताना अनेकांनी आजारी पडल्यावर शहरी गरीब योजनेचा लाभ घेतला . आणि रुग्णालयाच्या खर्चातून मुक्तता मिळवून कसेबसे संसार संभाळत आहेत .आता घर आहे म्हणजे त्याचा महापालिकेचा कर त्यांनी भरला तर ते श्रीमंत झालेत काय ? घर असूनही गरिबीत ,हलाखीत जीवन जगणाऱ्यांना नोटीसा पाठवून त्यांची थट्टा उडविण्याचे काम महापालिकेने चालविले असल्याचा आरोप ही धनवडे यांनी केला आहे.