मुंबई, दि. २२ ऑगस्ट – भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. समाजसुधारक किंवा राजकीय नेते कुटुंबात फार कमीच वेळ देत असतात, राज्यातील प्रश्न सोडवत असताना, दौरे करत असताना कुटुंबात फार वेळ दिला जात नाही. परंतु अशा सणाच्यानिमित्ताने कुटुंबाशी भेटण्याची संधी मिळते, सर्व भावंड एकत्रित येऊन गप्पा गोष्टी करतो, सर्वांशी भेट होते. तशाचं पद्धतीने आज रक्षाबंधन निमित्ताने कुटुंबासमवेत गप्पा गोष्टी करण्यासाठी निवांत वेळ मिळाला असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज कुटुंबासमवेत रक्षाबंधनाचा सण आज साजरा केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, रक्षाबंधन हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे विशेषतः महाराष्ट्रात रक्षा बंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला खूप आनंदात, उत्साहात व परंपरेने साजरा केला जात असतो. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण असून प्रत्येक भाऊ-बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्व दिले जाते. आज बहिणी आपल्या भावाला राखी बांधत असतात. एकमेकांविषयी शुभचिंतन करतात. स्नेहाचं असं अतूट नातं या सणानिमित्ताने दिसून येते. तसेच सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरत असल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले.