पुणे : हावभाव आणि पदंन्यासाची सुंदर गोफ विणून प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी सादर केलेली नृत्यप्रस्तुती, त्यावर रसिकांची लाभलेली वाहवा तसेच शास्त्रीय गायनाचा ध्यास आपल्या गायकीतून दर्शवून समस्त रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध गायक पं. राजेंद्र कंदलगावकर यांची कलाप्रस्तुती एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी काल रसिकांना लाभली. निमित्त होते स्ट्रेटलाईन एंटरटेन्मेंटतर्फे झालेल्या ‘आराधना’ मैफलीचे.
डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्या नृत्यप्रस्तुतीने मैफलीची सुरुवात झाली. ‘प्रथम सुमन श्रीगणेश’ या गणेशवंदनेने त्यांनी आपल्या सादरीकरणास प्रारंभ केला. त्यानंतर प्रस्तार तालातील बंदीशीतून कलेचे आद्य दैवत असणाऱ्या नटराजास त्यांनी वंदन केले. ‘सृजन कसा मन चोरी’ यातून प्रेयसीच्या मनातील भावना आणि ‘सांगती खोटे त्या गौळणी’ यातून कृष्णाच्या नटखट लीला ही नृत्यपदे रसिकांना विशेष भावली. ‘दिन हून द्या करी देवा मजवरी’ या भक्तीगीताने त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सांगता केली.
यावेळी त्यांना श्री ऋषीकेश बडवे(गायन), श्री. गोविंद भिलारे(पखवाज), श्री. आशय कुलकर्णी (तबला), श्री. चिन्मय कोल्हटकर(संवादिनी) तर श्री. सुनील अवचट (बासरी) साथसंगत केली. पं. राजेंद्र कंदलगांवकर यांच्या मल्हार रागाने गायकीची सुरुवात झाली. पाऊस नाही पण मल्हार गातो असे कंदलगावकर मिश्कीलपणे म्हणताच पावसाच्या जोरदार सरी कोसळ्यास सुरुवात झाली या योगायोगामुळे मैफलीची रंगत अजून वाढली. नामाचा गजर गर्जे भीमा तीरी यासारख्या भक्तीगीताने त्यांनी आपल्या सुरेल गायकीची सांगता केली. या सादरीकरणात वजनदार ठेका व लग्गीच्या जोरावर श्री अनिरुद्ध देशपांडे यांनीे समर्पक अशी साथ दिली. श्री. अभिजित पाटसकर यांच्या संवादिनीवरील साथीने मैफलीत रंग भरले. शास्त्रीय कलेचा प्रचार आणि प्रसार हा हेतू आराधना मैफलीमागील असल्याचे मत यावेळी संस्थेचे रसिक गुर्जर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. समाधान निकुंभ यांनी केले.