नृत्यभारतीच्या ७० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजन
पुणे ता. २१: नृत्यभारती डान्स अकॅडमीच्या ७०व्या वर्षपूर्तीनिमित्त येत्या २७ तारखेला ‘अनुबद्ध’ या कथक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ६.३० ते १०.३० या दरम्यान ही मैफल रंगणार असून संस्थेच्या जगभरातील शाखांमधील ५० निपुण नर्तकींचा नृत्यविष्कार एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची अनोखी संधी यानिमित्ताने रसिक पुणेकरांना लाभणार आहे.
पं. रोहिणीताई भाटे यांच्या शैलीत नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ रचनांचे सादरीकरण हे ‘अनुबद्ध’ मैफलीचे प्रमुख आकर्षण ठरेल. कथक केंद्र, दिल्लीच्या अध्यक्षा कमलिनी अस्थाना यादेखील या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहणार असून प्रसिद्धतबलावादक पं. अरविंदकुमार आजाद आणि संगीतकार अजय पराड यांच्या सुरेल साथीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढेल.
या महासोहळ्याच्या औचित्याने संस्थेच्या शाखांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘मति अमित गति ललित’, ‘संचित आणि सृजन’, ‘आवर्तन’, ‘अनुग्रह’, ‘अनाहत’ ‘एकल विद्या’, ‘उजवी बाजू’ आदी मैफलींना रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. तसेच या माध्यमातून कलाकारांना हक्काचे व्यासपीठही उपलब्ध झाले.
कथक कलेचा आणि पं. रोहिणीताई भाटे यांच्या नृत्याविष्काराचा वारसा नृत्यभारती संस्था गेली ७० वर्षे अव्याहतपणे जपत आहेे. ‘अनुबद्ध’ मैफल म्हणजे या अथक मेहनतीचे मूर्त रूप असून याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.