पुणे : राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने कायदा, सुव्यवस्था, सामाजिक प्रबोधन यांवर ताशेरे ओढण्यापेक्षा महिलांना स्वतः चे संरक्षण स्वतः करता आले पाहिजे, या भावनेने लव्हलीना शहा यांनी मार्शल आर्ट चॅम्पियन राजन वर्नेकर यांच्या सहकार्याने महिलांना मोफत स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण दिले
हडपसर येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील १६ वर्षांपेक्षा कमी वयातील मुलींसाठी ही विनामूल्य स्वरूपात कार्यशाळा घेण्यात आली .सुमारे ६० विद्यार्थ्यांनींनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून या कार्यशाळेचा लाभ घेतला.
या उपक्रमात सुरक्षितता जागरूकता, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती, दैनिक जीवनातील सुरक्षाविषयी माहिती व उपयुक्त ठरणारी संरक्षण तंत्र यांसारख्या विषयांवर लव्हलीना शहा व राजन वर्नेकर यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
लव्हलीना शहा सामाजिक कार्यकर्त्या असून अनेक लोकाभिमूख उपक्रम वैयक्तिक पातळीवर राबविले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी काम करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले असून अशा महिलांना सुरक्षा विषयक व्यावसायिक प्रशिक्षण देण्या बरोबरच, वैद्यकीय व दंत तपासणी, लसीकरण शिबीर आदी उपक्रम शहा यांनी विनामूल्य स्वरूपात राबविले आहेत. तर राजन वर्नेकर हे देखील मार्शल आर्ट चॅम्पियन असून बलात्कारासारखा प्रसंग ओढवल्यावर उपयुक्त ठरणारी प्रात्यक्षिकांचे धडे व कायद्याची माहिती विद्यार्थीनींना गेली अनेक वर्ष देत आहेत.