प्रकृति कथक नृत्यालयतर्फे ‘संवेदन’ मैफलीचे आयोजन
पुणे ता. २८: जयपूर घराण्याच्या सुविख्यात नृत्यांगना प्रेरणा श्रीमाळी यांचा नृत्याविष्कार आणि लोक गायनावर आधारित पार्वती बाऊल यांचा स्वरविन्यास एकाच मंचावर अनुभविण्याची दुर्मिळ संधी ‘संवेदन’ मैफलीतून रसिक पुणेकरांना लाभणार आहे. येत्या शुक्रवारी(दि.२) बालशिक्षण मंदिर सभागृह, येथे सायंकाळी ५.३० वाजता या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कथक सम्राज्ञी विदुषी गुरू रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम योजिला आहे. प्रकृति कथक नृत्यालयाच्या संस्थापिका व रोहिणीताईंच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला जात आहे.
केंद्रीय संगीत नाटक अकॅडमीसह अनेक नामवंत पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या प्रेरणा श्रीमाळी यांचा अभिजात शैलीतील नृत्याविष्कार पाहण्याची संधी प्रेक्षकांना ‘संवेदन’ मधून मिळेल. तर एका हातात एकतारा आणि कंबरेभोवती बांधलेल्या डमरूच्या साथीने पार्वती बाऊल यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण याच मैफलीत रसिकांना अनुभवता येईल. बंगालमधील प्रसिद्ध ‘बाऊल’ लोकसंगीताची उत्कट आध्यात्मिक अनुभूती बाऊल यांच्या स्वरविन्यासातून ऐकावयास व पहावयास मिळेल. श्रीमाळी यांच्या नृत्याची, बाउल यांच्या गायनाची ‘संवेदन’ मैफल रसिक पुणेकरांसाठी पर्वणीच ठरेल, असा विश्वास नीलिमा अध्ये यांनी व्यक्त केला आहे.