पुणे – जागतिक स्तरावर इंजिनीअरिंग सेवा पुरवणाऱ्या टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेडने विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत (व्हीडीआयए) सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या “मेड इन विदर्भ- एरोस्पेस अॅण्ड डिफेन्स” परिषदेत हा करार झाला. या भागीदारीच्या माध्यमातून नागपूरमध्ये एक अत्याधुनिक एरोस्पेस अॅण्ड डिफेन्स सेंटर स्थापन केले जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या एमओयूवर स्वाक्षऱ्या झाल्या.
“मेक इन इंडिया” उपक्रमाच्या पाठिंब्याने हे केंद्र महाराष्ट्राला अवकाशविषयक आणि संरक्षण साहित्याच्या उत्पादनातील गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे स्थान म्हणून ओळख निर्माण करण्यात मदत करेल. त्याचप्रमाणे एतद्देशीय व आधुनिक तंत्रज्ञानात्मक क्षमतांना बढावा देईल आणि सुक्ष्म, छोट्या, मध्यम उद्योगांना अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी आवश्यक कुशल संसाधनांचा विकास करण्यातही याची मदत होणार आहे. यासाठी एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्राला सहाय्य करणारे ‘निर्माण’ हे ना-नफा तत्त्वावरील केंद्र स्थापन करण्यात येईल तसेच इंजिनीअरिंग संस्था आणि विद्यापीठांना स्पर्धात्मकतेवर आधारित शिक्षण पुरवणारा व उच्च कौशल्यविकास केंद्र स्थापन करणारा ‘उडान’ हा उपक्रम सुरू केला जाईल. टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारच्या पाठबळावरील व्हीडीआयए यांच्यातील भागीदारीमुळे राज्याचा विकास एक अवकाशविषयक व संरक्षणविषयक सामुग्रीचे उत्पादन व निर्यात करणारे केंद्र म्हणून होईल.
या सहयोगाबद्दल टाटा टेक्नोलॉजीजच्या आशिया–पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष आनंद भदे म्हणाले, “मेड इन विदर्भ- एरोस्पेस अॅण्ड डिफेन्स हा एक उत्तम उपक्रम आहे आणि त्याच्याशी जोडले गेल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारतातील एरोस्पेस आणि डिफेन्स उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होता यावे म्हणून संरक्षण-एकात्मिक विकासाला मदत करणारी अशा प्रकारची पहिलीच परिसंस्था निर्माण करण्याची व्हीडीआयएची योजना आहे. टाटा टेक्नोलॉजीज एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात देऊ करत असलेली अनोखी सेवा यासाठी सुसंगत ठरेल.”
यावेळी व्हीडीआयएचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) श्री. रवींद्र थोडगे म्हणाले, “नागपूर अर्थातच विदर्भामध्ये एक एरोस्पेस आणि डिफेन्स उत्पादन केंद्र तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रातील आपल्या कौशल्याचा उपयोग करून घेत प्रकल्पाला आवश्यक ती चालना देण्याची सर्वोत्तम क्षमता टाटा टेक्नोलॉजीमध्ये आहे.”
टाटा टेक्नोलॉजीजविषयी:
जगातील आघाडीच्या उत्पादकांसाठी काळाच्या पुढे चालणाऱ्या उत्पादनांचे डिझाइनिंग, इंजिनीअरिंग आणि पडताळणी करून टाटा टेक्नोलॉजीज उत्पादन विकासातील स्वप्ने सत्यात उतरवण्याचे काम करत आहे. जगभरातील ८५०० व्यावसायिकांच्या मदतीने काम करणारी टाटा टेक्नोलॉजीज म्हणजे उत्पादन उद्योगासाठी प्रगत इंजिनीअरिंग, संशोधन व विकास, उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन, सल्लागार सेवा व सॉफ्टवेअर तसेच कनेक्टेड एंटरप्राइज आयटी सोल्युशन्स पुरवणारा महत्त्वाचा भागीदार झाला आहे.