● जग्वार लँड रोव्हर इंडियाने आपल्या भारतात लाँच होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन श्रेणीच्या एण्ड–टू–एण्ड चार्जिंग सोल्युशन्ससाठी केली टाटा पॉवरबरोबर भागीदारी
● टाट पॉवर जग्वार लँड रोव्हर रिटेलर्स व ग्राहकांना पूर्ण चार्जिंग सोल्युशन्स आणि आवश्यक ते विक्रीउत्तर सहाय्य पुरवणार
● या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत भारतात दाखल होणाऱ्या आगामी जग्वार आय–पेसच्या ग्राहकांना या भागीदारीचा लाभ मिळणार; त्याचप्रमाणे जग्वार लँड रोव्हर बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स (बीईव्ही) आणि प्लग–इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या (पीएचईव्ही) ग्राहकांनाही या भागीदारीचा लाभ मिळणार
नवी दिल्ली : जग्वार लँड रोव्हर इंडियाने एण्ड–टू–एण्ड ईव्ही चार्जिंग सोल्युशन्ससाठी टाटा पॉवरबरोबर भागीदारी करार केल्याची घोषणा आज केली. टाटा पॉवर जग्वार लँड रोव्हरच्या भारतातील वाहनांना त्यांच्या २४ शहरांतील २७ आउटलेट्सच्या रिटेल नेटवर्कमध्ये तसेच ग्राहकाच्या घरी आणि/किंवा कार्यालयांमध्ये चार्जिंग सोल्युशन्स पुरवेल. भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक वीजकंपनी टाटा पॉवर ७ किलोवॉट ते ५० किलोवॉट क्षमतेच्या एसी व डीसी चार्जर श्रेणी पुरवण्यासाठी जबाबदार असेल. निश्चित केलेल्या ठिकाणांवर चार्जर्सच्या स्थापना व व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी तसेच अन्य विक्रीउत्तर सहाय्य सेवांसाठी टाटा पॉवर हा पसंतीचा भागीदार (प्रीफर्ड पार्टनर) असेल.
जग्वार लँड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. रोहित सुरी म्हणाले, “टाटा पॉवरबरोबर झालेली भागीदारी म्हणजे जग्वार लँड रोव्हरच्या ग्राहकांसाठी प्रचंड मोठे मूल्यवर्धन ठरेल, कारण यामुळे त्यांच्या चार्जिंगसंदर्भातील गरजांसाठी वन–स्टॉप सोल्युशन पुरवले जाणार आहे आणि टाटा पॉवर भारतभरात स्थापन करत असलेल्या व्यापक चार्जिंग नेटवर्कचा लाभही त्यांना सुलभरितीने घेणे शक्य होणार आहे. ही भागीदारी म्हणजे जग्वार आय–पेस या आमच्या पहिल्या इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या मालकांना वाहनाचे चार्जिंग सुलभ व सुरळीत पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी योग्य त्या परिसंस्थेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. जग्वार आय–पेस या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत भारतात दाखल होत आहे.”
टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे सीएफओ आणि अध्यक्ष रमेश सुब्रमण्यम म्हणाले, “टाटा पॉवरला जग्वार लँड रोव्हर इंडियाचा एण्ड–टू–एण्ड ईव्ही चार्जिंग भागीदार म्हणून काम करण्यात आनंद आहे. भारतातील ईव्ही चार्जिंग क्षेत्रातील आघाडीची एकात्मिक कंपनी म्हणून आम्ही जग्वार लँड रोव्हर इंडियाच्या ईव्ही ग्राहकांना त्यांच्या घरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगचा सुलभ, व्यापक व अखंडित अनुभव देऊ. त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे आणि जग्वार लँड रोव्हर इंडिया भारतात आणत असलेल्या इलेक्ट्रीफाइड वाहनश्रेणी हाताळण्याच्या आमच्या क्षमतेचे प्रतीक म्हणजे ही भागीदारी आहे.”