पुणे : येथील दत्तवाडीमधील संजय महादेव सुर्वे यांच्या गळफास घेऊन आत्महत्याकेल्याच्या प्रकरणी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवीत दत्तवाडी पोलिसांनी भाजपचे नगरसेवक आनंद रमेश रिठे (रा. साई मंदिराजवळ, दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संजय महादेव सुर्वे (वय ५३, रा. महादेव बिल्डिंग, दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शशांक संजय सुर्वे (वय २६) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२१ पासून २१ जून २०२१ पर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुर्वे यांनी सोमवारी त्यांच्या इमारतीमधील पौर्णिमा सायकल नावाचे सायकल दुरुस्तीच्या दुकानाच्या छताचा दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय सुर्वे यांन आनंद रिठे यांनी मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले, अशी शशांक सुर्वे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.