४५ मिनिटांत भूकंपाचे अनेक उत्तरधक्के; विमानतळाच्या टर्मिनलचे नुकसान, त्सुनामीचा धोका नसल्याची माहिती
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याला शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) सकाळी ५.० तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. लॉस एंजेलिससह आसपासच्या अनेक भागांत भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाचा परिणाम लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवरही झाला. विमानतळावर उतरणाऱ्या काही विमानांना अन्यत्र वळविण्यात आल्याचे वृत्त आहे.
भूकंपाच्या धक्क्यामुळे विमानतळावरील एका टर्मिनलच्या छताचे काही भाग निखळून पडले, तर अनेक दुकानांमधील वस्तू जमिनीवर कोसळल्या.
समुद्रात होता भूकंपाचा केंद्रबिंदू
अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊच्या सुमारास मॅनहॅटन बीचपासून सहा किलोमीटर अंतरावर समुद्रात हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे १२ किलोमीटर खोलीवर होता.
भूकंपाचे धक्के पासाडेना शहरापर्यंत जाणवले.
४५ मिनिटांत अनेक उत्तरधक्के
मुख्य भूकंपानंतर अवघ्या ४५ मिनिटांत अनेक उत्तरधक्के (आफ्टरशॉक) जाणवले. त्यापैकी सर्वाधिक तीव्रतेचा धक्का ३.७ क्षमतेचा होता.
लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाने तातडीने आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्रिय केली. शहरातील १०६ अग्निशमन केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तैनात करण्यात आले. प्राथमिक पाहणीत जीवितहानी किंवा इमारतींचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
भूकंपानंतर रिफायनरीतून धुराचे लोट
लॉस एंजेलिस विमानतळाजवळील शेवरॉनच्या एल सेगुंडो तेल शुद्धीकरण प्रकल्पातून भूकंपानंतर ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले. मात्र, ही दुर्घटनात्मक आग नसून सुरक्षेच्या प्रक्रियेअंतर्गत अतिरिक्त वायू नियंत्रित पद्धतीने जाळण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण कॅलिफोर्नियाच्या इंधन पुरवठ्यात या तेल शुद्धीकरण प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे.
त्सुनामीचा धोका नाही; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास यांनी नागरिकांना संभाव्य उत्तरधक्क्यांच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेच्या त्सुनामी इशारा केंद्राने या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.

