मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून भाजपसह शरद पवार गटावर घणाघाती टीका; २०२४ मध्ये आपल्यालाही भाजपने ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कायमस्वरूपी सत्तेत राहण्यासाठी भाजपने मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून देश तोडण्याचे षड्यंत्र रचले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलताना प्रणिती शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्या पक्षाच्या संभाव्य भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. पुरोगामी विचारांच्या आधारावर निवडून आलेल्या पक्षाने या विधेयकाला पाठिंबा दिल्यास तो मतदारांचा आणि संविधानाचा अपमान ठरेल, असे त्यांनी सुनावले.
महिला आरक्षणाच्या नावाखाली प्रस्थापितांना वाचवण्याचा डाव
मतदारसंघ पुनर्रचना करताना नवीन जनगणनेच्या आधारे निर्णय घेणे अपेक्षित असताना केंद्र सरकार २०११ च्या जनगणनेच्या आधारावर पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
सरकार खरोखरच महिला आरक्षणाबाबत गंभीर असेल, तर सध्याच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांमध्येच महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करावे. मात्र, असे केल्यास अनेक प्रस्थापित पुरुष नेत्यांना आपल्या जागा गमवाव्या लागतील. त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मतदारसंघांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
काश्मीर आणि आसाममध्ये मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून भाजपने आपल्या मतपेढीला अनुकूल परिस्थिती निर्माण केली. आता देशभरात त्याच पद्धतीचा अवलंब करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खासदारांना १५० कोटींची ऑफर दिल्याची चर्चा; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी खासदारांवर दबाव आणला जात असल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला. खासदारांना प्रत्येकी १५० कोटी रुपये दिले जात असल्याची चर्चा वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर सुरू आहे. ही चर्चा खरी असेल, तर हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने आपल्यालाही ऑफर देण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
आम्ही अशा ऑफरला भीक घालत नाही. आमच्या रक्तात काँग्रेस आहे आणि आमची निष्ठा देश व संविधानाशी आहे, असे प्रणिती शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
सुप्रिया सुळेंच्या भूमिकेबाबत आश्चर्य
महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष म्हणून निवडून दिले आहे. अशा परिस्थितीत या पक्षाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिल्यास तो जनतेच्या विश्वासाचा आणि संविधानाचा अपमान ठरेल, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांना संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेतल्यास आपल्याला आश्चर्य वाटेल, असेही शिंदे यांनी नमूद केले.
आमचा विचार एखाद्या राज्यापुरता किंवा मुख्यमंत्रीपदापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण देशाच्या हिताचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
केवळ इंडिया आघाडीशी नव्हे, तर देशाशी विश्वासघात ठरेल
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांवरही प्रणिती शिंदे यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा डीएमके, या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे केवळ काँग्रेस अथवा इंडिया आघाडीशी नव्हे, तर देशाशी विश्वासघात करण्यासारखे ठरेल, अशी टीका त्यांनी केली.
ज्या विचारसरणीच्या आधारावर जनतेने निवडून दिले, त्याच विचारांच्या विरोधात भूमिका घेतल्यास राजकीय अस्तित्व कसे टिकणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशाच्या संघराज्य रचनेला धोका निर्माण होण्याचा इशारा
प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेमुळे भविष्यात काही मोजक्या राज्यांकडे राजकीय सत्ता आणि निधी एकवटण्याचा धोका असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
इतर राज्यांवर अन्याय झाल्यास आगामी दहा ते वीस वर्षांत देशाच्या एकात्मतेसमोर गंभीर आव्हान निर्माण होऊ शकते. काही राज्यांमध्ये स्वतंत्र होण्याची भावनाही निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.
संवैधानिक संस्थांवरही प्रश्नचिन्ह
निवडणूक आयोग आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित करत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर संवैधानिक संस्थांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा आरोप केला.
सत्तेसाठी देशाच्या संघराज्य व्यवस्थेला आणि संविधानाला धक्का देण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही. या विधेयकाला काँग्रेस शेवटपर्यंत कडाडून विरोध करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

