‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’वर महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई; सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा
पुणे : शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू असतानाच सार्वजनिक रस्त्यांवर बांधकामाचा राडारोडा टाकून अस्वच्छता करणाऱ्यांविरोधातही पुणे महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई सुरू ठेवली आहे. बुधवार पेठेतील तपकिरी गल्ली येथे सार्वजनिक मार्गावर बांधकामाचा राडारोडा टाकल्याप्रकरणी ‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम व्यावसायिकावर २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील प्रभाग क्रमांक २३ मध्ये मंगळवारी (२४ नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली.
तपकिरी गल्ली परिसरातील बांधकामाचा राडारोडा सार्वजनिक मार्गावर टाकण्यात येत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांना त्रास होत असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित बांधकाम व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई केली.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त तिमय्या जगले यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, चंद्रवदन गायकवाड, आरोग्य निरीक्षक तौसीफ देशपांडे, कृष्णा अवघडे आणि मोकादम उपस्थित होते.
बांधकाम व्यावसायिकांनो, खबरदार!
सार्वजनिक रस्त्यांवर अनधिकृतपणे राडारोडा अथवा कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणे आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

