दुष्काळी मदतीसाठी कोथरुडकर सरसावले
समुत्कर्षच्या माध्यमातून १० टन धान्याची पहिली खेप रवाना
पुणे- दुष्काळी भागातील नागरिकांना मदतीसाठी सर्वसामान्य नागरिकांनी ही पुढाकार घ्यावा, यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुडकरांना आवाहन केले होते. ना. पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांकडून प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली असून, समुत्कर्षच्या माध्यमातून १० टन धान्याची पहिली खेप रवाना झाली आहे.
सध्या राज्यात दुष्काळ परिस्थिती असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईसह शेतमाल कपरपून गेल्याने, शेतकरी बांधवांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या संकटातून दुष्काळी भागातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु असले तरी, नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन ना. पाटील यांनी केले होते.
विशेष म्हणजे, लोकसहभाग वाढविण्यासाठी ना. पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित समुत्कर्ष ग्राहक पेठेतून ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करुन दिले होते. यामध्ये नागरिकांनी अथवा स्वयंसेवी संस्थांनी निधी संकलित करुन ५० टक्के सवतीमध्ये धान्य खरेदी करण्याची आणि दुष्काळी भागापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण केली आहे.
ना. पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, पाषाण मधील जय भवानी ट्रस्टने लोकवर्गणी गोळा करुन १० टन धान्य खरेदी केले. हे सर्व धान्य बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील दुष्काळी भागातील गावांमध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

