नायगाव रेल्वे दुर्घटनेतील पीडित तरुणीला न्याय, आर्थिक मदत व पुनर्वसन देण्याची मागणी; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र
पुणे, : मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व महिला व दिव्यांग डब्यांमध्ये पॅनिक बटन, इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणीची छेडछाड करण्यात आली. तिने विरोध केल्यामुळे आरोपीने तिला नायगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळांवर ढकलल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत तरुणीचा डावा हात कोपरापासून कापावा लागला असून, डोक्याला १६ टाके पडले आहेत. या घटनेबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत कठोर कारवाई करून पीडित तरुणीला जलदगतीने न्याय मिळवून द्यावा. तसेच तिच्या उपचारांसाठी, कृत्रिम हातासाठी आणि दीर्घकालीन पुनर्वसनासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पॅनिक बटन दाबताच तातडीने मदत मिळावी
मुंबई उपनगरीय रेल्वेतील काही डब्यांमध्ये आपत्कालीन संपर्क यंत्रणा उपलब्ध असली, तरी सर्व महिला व दिव्यांग डब्यांमध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. पॅनिक बटन दाबताच मोटरमन, ट्रेन मॅनेजर, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना तातडीने सूचना मिळून प्रवाशांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे. यंत्रणांची नियमित तपासणी करून त्या कायम कार्यरत राहतील याची खात्री करावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.
महिला व दिव्यांग डब्यांमध्ये सीसीटीव्ही, नियमित पोलीस गस्त आणि रेल्वे सुरक्षा हेल्पलाइन १३९ ची माहिती ठळकपणे उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“महिलांना आणि दिव्यांग प्रवाशांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व निर्भयपणे प्रवास करता येणे ही रेल्वे प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. नायगावसारख्या गंभीर घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पीडितेला न्याय मिळवून द्यावा आणि मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला व दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष कृती आराखडा राबवावा, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

