व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या ‘शताब्दी निधी’ला स्थायी समितीची मान्यता
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय व कायदेविषयक कारकिर्दीला सन २०२६ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी एक कोटी रुपयांचा विशेष ‘शताब्दी निधी’ मंजूर करण्यास पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
भारतीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि कायदेविषयक क्षेत्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या संसदीय व कायदेविषयक कार्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देणे, या उद्देशाने महापालिकेने विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, जनजागृतीपर कार्यक्रम तसेच विविध दिनविशेषांनिमित्त आयोजित उपक्रमांचा समावेश असेल.
या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसदीय व कायदेविषयक कारकीर्द शताब्दी निधी’ या नावाने एक कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
मंजूर निधीचा विनियोग शासनाच्या तसेच पुणे महानगरपालिकेच्या प्रचलित नियम, अटी आणि आर्थिक तरतुदींनुसार करण्यात येणार आहे. कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही संबंधित विभागांमार्फत करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव कार्यालयातील १६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या ठरावात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. या ठरावावर सूचक म्हणून सौ. अर्चना अमित जगताप यांचे नाव नमूद आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय आणि कायदेविषयक कार्याच्या शताब्दी वर्षानिमित्त महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या विचारांचा, संविधानिक मूल्यांचा आणि संसदीय कार्याचा वारसा नागरिकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.


