१४.८७ लाखांचा साठा जप्त; ५५९ किलो मिठाई व खाद्यपदार्थ नष्ट, १३ प्रकरणांत परवाने निलंबनाची कार्यवाही; सात आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा
पुणे, दि. ६ नोव्हेंबर २०२६ (माय मराठी वृत्तसेवा) :
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मिठाई विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांविरोधात तपासणी मोहीम तीव्र केली आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ५ नोव्हेंबर रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील २० आस्थापनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईत तब्बल ५ हजार १९९ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १४ लाख ८७ हजार २९० रुपये आहे. त्यापैकी ५५९ किलो खाद्यपदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले.
नारायणगाव आणि पिंपरी सांदस येथे मोठी कारवाई
या मोहिमेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
नारायणगाव येथील भैरवनाथ फूड्स या आस्थापनेतून ६६६ किलो हलव्याचा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये महिम हलवा आणि बदाम हलव्याचा समावेश आहे.
पिंपरी सांदस येथील नायकवाडे डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्समधून तब्बल ३ हजार ९९ किलो खवा जप्त करण्यात आला.
रावेत येथील माधव मिठासमधून १४२ किलो पेढे आणि बालुशाही, तर मोशी येथील बिकानेर स्वीट्समधून १६० किलो बर्फीचा साठा जप्त करण्यात आला.
याशिवाय विविध ठिकाणी बुंदी, मावा, शेव आणि इतर मिठाईच्या साठ्यावरही कारवाई करण्यात आली.
सातारा आणि कोल्हापुरातही तपासणी
एफडीएच्या कारवाईचा विस्तार सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांपर्यंत होता.
साताऱ्यातील बॉम्बे स्वीट्समधून १४ किलो मिठाई जप्त करण्यात आली. कोल्हापूर परिसरात फरसाण, बुंदी, पापडी आणि लाडू यांच्या उत्पादन व विक्रीसंदर्भात तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान काही आस्थापनांमध्ये स्वच्छतेचा अभाव, अयोग्य साठवणूक, खाद्यपदार्थांवरील आवश्यक लेबलांचा अभाव आणि खाद्यरंगाच्या वापराशी संबंधित नोंदींमध्ये त्रुटी आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.
५५९ किलो खाद्यपदार्थ जागेवर नष्ट
या कारवाईदरम्यान काही ठिकाणी जप्त केलेला नाशवंत अथवा अन्नसुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद साठा जागेवरच नष्ट करण्यात आला.
माधव मिठास, बिकानेर स्वीट्स, रुची मिष्ठान भंडार, पंचाली स्वीट्स, कन्हैया स्वीट्स, बंधन स्वीट्स आणि आदर्श बेकर्स या आस्थापनांशी संबंधित एकूण ५५९ किलो खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.
नष्ट करण्यात आलेल्या या साठ्याची अंदाजे किंमत २ लाख ५९ हजार ७० रुपये आहे.
१३ प्रकरणांत परवाने निलंबनाची कार्यवाही
तपासणीत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने १३ प्रकरणांत अन्न व्यवसायाचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
तसेच आवश्यक वैध परवाना किंवा नोंदणी नसल्याच्या कारणावरून सात आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री करताना स्वच्छता, योग्य लेबलिंग, आवश्यक परवानग्या आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दिवाळीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष
दिवाळीत मिठाई, खवा, मावा, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी निकृष्ट दर्जाचे अथवा नियमांचे पालन न करता तयार केलेले पदार्थ बाजारात विकले जाऊ नयेत, यासाठी एफडीएने तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे.
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून, व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांची स्वच्छता, योग्य साठवणूक आणि गुणवत्तेची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जप्त केलेल्या साठ्याबाबत पुढील प्रयोगशाळा तपासणी आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येणार आहे.


