पुणे -महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सन २०२६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर केलेली सुट्टी रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे सुधारित कार्यालयीन परिपत्रक पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी जारी केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता तीन अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या सेवकांसाठीही अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत सुधारणा करण्यात आल्याने महापालिकेच्या सुट्ट्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजीची धनत्रयोदशीची सुट्टी रद्द करून सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त सुट्टी देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळून सर्व कार्यालयांना लागू
ही सुधारित स्थानिक सुट्टी पुणे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना लागू राहणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा या सुट्टीतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित सेवांचे कामकाज आवश्यकतेनुसार सुरू राहणार आहे.
या बदलाची नोंद घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. खातेप्रमुख, विभागप्रमुख, परिमंडळांचे उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी या सुधारणेची अंमलबजावणी करावी, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्तची स्थानिक सुट्टी आता ६ नोव्हेंबरऐवजी ९ नोव्हेंबर रोजी असणार आहे.

