स्त्रियांना मनातले प्रामाणिकपणे मांडण्यासाठी अवकाश द्या : मंगला गोडबोले
स्त्रियांनी लेखणीच्या आधाराने व्यक्त होणे अपरिहार्य : मल्लिका अमरशेख
साहित्य परिषद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ९९ नांदी संमेलने : योगेश सोमण
पुणे, : स्त्री-पुरुष भेदभावाच्या पिढ्यान्पिढ्या रुजविलेल्या धारणा जाणीवपूर्वक पुसून टाकण्याची, म्हणजेच ‘अनलर्न’ करण्याची प्रक्रिया वेगाने घडली पाहिजे. स्त्रीवाद प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही मानसिकतेत मूलभूत बदल आवश्यक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका तथा संमेलनाध्यक्षा डॉ. छाया महाजन यांनी केले. स्त्रियांच्या अनुभवांना आणि अभिव्यक्तीला मोकळा अवकाश देण्यासोबतच त्यांच्या निर्णयाचा आणि नकाराचा सन्मान करणारा समाज घडविण्याची गरज स्वागताध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ९९ नांदी संमेलनांपैकी १४ व्या ‘स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या’ उद्घाटन सत्रात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त सहभागातून शनिवारी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर येथील के. बी. जोशी सभागृहात हे संमेलन आयोजित करण्यात आले. उद्घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, लेखिका-कवयित्री मल्लिका अमरशेख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी विचार मांडले.
संमेलनाला पुणे, मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, बीड आणि नागपूर आदी किमान सात जिल्ह्यांतील श्रोत्यांचा सहभाग लाभला. बारामती, इंदापूर, शिरूर, राजगुरुनगर-खेड, मोरगाव, इस्लामपूर आणि पंढरपूर येथून आलेल्या प्रतिनिधींनीही सहभाग नोंदविला. पुणे शहरातील कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, वारजे, सिंहगड रस्ता, औंध, बोपोडी, विश्रांतवाडी, वडगाव शेरी आणि शिवाजीनगर परिसरातील साहित्यरसिक उपस्थित होते. गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही सहभाग होता. विविध भागांतील महिला, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासकांच्या उपस्थितीमुळे स्त्रियांच्या अनुभवविश्वावरील संवादाला व्यापक स्वरूप मिळाले.
डॉ. छाया महाजन म्हणाल्या की, स्त्रीचे देवी म्हणून उदात्तीकरण केले जाते; मात्र तिच्या दैनंदिन आयुष्यात तिला व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा, निर्णयप्रक्रियेत सहभाग आणि समान स्थान कितपत मिळते, याचा विचार व्हायला हवा. संरक्षणाच्या नावाखाली तिचे अधिकार मर्यादित करता कामा नयेत. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी आजही अंतर, असुरक्षितता आणि सामाजिक बंधनांचा सामना करावा लागतो. त्यावरील उत्तर मुलींना घरात बसविणे हे असू शकत नाही.
स्त्रीचे चारित्र्य केवळ लैंगिकतेच्या निकषावर ठरविणाऱ्या धारणांवर त्यांनी टीका केली. लैंगिक अत्याचाराला सामोरे गेलेल्या स्त्रीला दोष देणारी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणारी मानसिकता बदलली पाहिजे. पुढील पिढ्यांना समानतेचे जीवन मिळण्यासाठी घरातील जबाबदाऱ्यांतही पुरुषांचा प्रत्यक्ष सहभाग वाढला पाहिजे. समानतेची शिकवण देण्यासोबतच मनात रुजलेले भेदभावाचे संस्कार पुसण्याची प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्याच्या व्यासपीठांवर स्त्रियांबरोबरच समाजाने बाजूला ठेवलेल्या विविध घटकांच्या अभिव्यक्तीलाही स्थान देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
स्वागतपर मनोगतात शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रीवादाची व्यापक भूमिका मांडली. स्त्री-पुरुष समानता ही सूडाची संकल्पना नसून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा आणि स्वतःचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार मिळवून देणारी भूमिका आहे. शिक्षण, क्रीडा आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत स्त्रिया पुढे जात असतानाही छळ, दुजाभाव आणि त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती कायम आहे. स्त्रीचा नकार हा नकारच असतो, हे समाजाने स्वीकारले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
कार्यकर्त्या घडविण्यासाठी वाचन, अभ्यास आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी स्त्री आधार केंद्राच्या कामातील अनुभव मांडले. दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या वेदनांशी साहित्याने नाते जोडले पाहिजे. दुःखाची, प्रेमाची आणि संवेदनांची भाषा एकच असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आवाज बसलेला असतानाही त्यांनी प्रयत्नपूर्वक उपस्थितांशी संवाद साधला. विविध राज्यांतील महिला लेखिकांच्या साहित्याशी संवाद वाढविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मंगला गोडबोले यांनी स्वतःची ओळख ‘लेखणीवादी’ अशी करून देत स्त्रियांच्या बदलत्या अनुभवविश्वाचा आणि लेखनाचा आढावा घेतला. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वतःच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याच्या संधींमुळे स्त्रियांचे अनुभवविश्व विस्तारले आहे. मात्र कौटुंबिक अपयशाची जबाबदारी स्त्रीवरच टाकणे, तिच्या प्रयत्नांचे क्षुल्लकीकरण करणे आणि सार्वजनिक जीवनात तिला सूक्ष्मपणे अपमानित करणे या प्रवृत्ती कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपण कोणत्या माध्यमातून लिहितो यापेक्षा किती प्रामाणिकपणे लिहितो, हे महत्त्वाचे आहे. टाळ्या किंवा बाजारातील यश मिळणार नसले तरी मनातील हळुवार अनुभव व्यक्त करण्याची मोकळीक स्त्रीला मिळाली पाहिजे. तिच्या सर्जनशीलतेसाठी व्यक्तिगत आयुष्यात किमान शांतता, सुरक्षितता आणि न्याय आवश्यक आहे. स्त्रिया इतिहास, राजकारण, समाजशास्त्र, मानसशास्त्र यांसारखे विविध अभ्यासविषय हाताळत असून अनुवाद आणि माध्यमांतील लेखनातूनही आपले कौशल्य दाखवत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.
मल्लिका अमरशेख यांनी आपली ओळख धर्माच्या चौकटीत मर्यादित करण्यास नकार देत, आपण प्रथम माणूस आणि स्त्री असल्याची स्पष्ट भूमिका मांडली. स्त्रियांनी स्वतःचे अनुभव लिहिणे आणि स्वतंत्र विचार व्यक्त करणे आज अपरिहार्य झाले आहे. मतदानाच्या अधिकारासोबतच स्वतःचा आवाज मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अभिव्यक्तीच्या अधिकाराचा उल्लेख करत त्यांनी स्त्रियांना लिहिते होण्याचे आवाहन केले.
अमरशेख यांच्या काव्यवाचनातून स्त्रियांचे दैनंदिन श्रम, दडपलेला आक्रोश, प्रश्न विचारण्याची जिद्द आणि प्रतिकूलतेतही जीवन उभे करण्याचे सामर्थ्य व्यक्त झाले. भौगोलिक सीमा आणि सामाजिक भेदांच्या पलीकडे जगभरातील स्त्रियांच्या दुःखाशी असलेले नातेही त्यांच्या कवितांमधून उलगडले.
योगेश सोमण यांनी नांदी संमेलनांमागील साहित्य परिषदेची भूमिका स्पष्ट केली. परिषद लेखक, कवी, कादंबरीकार आणि प्रकाशकांपुरती मर्यादित न राहता वाचक, रसिक आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ९९ नांदी संमेलनांची संकल्पना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण ६५ विषयांवरील या मेळाव्यांतून विविध साहित्यप्रवाहांना व्यासपीठ मिळत असून, त्यातून येणाऱ्या उपयुक्त सूचनांचा शतक महोत्सवी संमेलनाच्या नियोजनात विचार केला जाणार आहे.
दुष्काळग्रस्तांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ म्हणून साहित्य संमेलनाची भूमिका महत्त्वाची आहे. शतक महोत्सवी संमेलन साधेपणाने, नेटकेपणाने आणि साहित्य-विचारांचा उच्च दर्जा राखून आयोजित करण्याची ग्वाही सोमण यांनी दिली. वाचक, साहित्यप्रेमी आणि साहित्यिकांनी या संमेलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

