पुणे, 13 ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील पदाबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चांना स्वतः तुकाराम मुंढे यांनी पूर्णविराम दिला आहे. “माझी FDA मधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंढे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पुढे म्हटले की, भेसळयुक्त अन्न, असुरक्षित व निकृष्ट खाद्यपदार्थ तसेच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधातील लढा सुरूच राहील. त्यामुळे MPSC चौकशी समितीची अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतरही FDA आयुक्तपदाची जबाबदारी तेच सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे जवळपास 12 दिवस आंदोलन सुरू होते. आंदोलनातील प्रमुख मागण्यांवर सरकारने मध्यस्थी केल्यानंतर 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर कथित पेपरफुटी आणि परीक्षांतील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती जाहीर करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून तुकाराम मुंढे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर मुंढे यांची FDA मधून बदली झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला होता. कारण गेल्या काही महिन्यांत FDA आयुक्त म्हणून त्यांनी भेसळयुक्त अन्न, अस्वच्छ खाद्यपदार्थ, औषधांच्या विक्रीतील अनियमितता आणि निकृष्ट औषधांविरोधात अनेक कारवाया केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीच्या चर्चांमुळे FDA मधील सुरू असलेल्या मोहिमांचे काय होणार, याकडेही लक्ष लागले होते. आता त्यांच्या स्पष्टीकरणामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.
दरम्यान, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांबाबतही आश्वासने दिली असून गट-क पदसंख्या वाढविणे, भरती प्रक्रिया आणि आंदोलनाशी संबंधित प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

