पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारातील त्रुटी, परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन महिन्यांसाठी पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
या समितीत प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे, बी. डी. नाईक आणि गणेश पाटील, पोलीस अधिकारी लखमी गौतम तसेच उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा समावेश असल्याचे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. समिती MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, कथित पेपरफुटीची प्रकरणे आणि आयोगाच्या कामकाजाशी संबंधित तक्रारींची चौकशी करणार आहे.
विशेषतः पेपरफुटीच्या आरोपांशी संबंधित सर्व प्रकरणांची तपासणी करण्याचा प्रस्ताव समितीसमोर आहे. यापूर्वी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीवरूनही मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू झाली होती.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही मसुद्यात उल्लेख आहे. तसेच 2027 मध्ये होणाऱ्या गट-क परीक्षेतील पदसंख्या वाढवण्याचा मुद्दाही सरकारसमोर ठेवण्यात आला आहे.
गेल्या 11 दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनानंतर सरकार आणि आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. सरकारकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याचा प्रश्न अजूनही कायम आहे.

