“MPSC आंदोलन आता विद्यार्थ्यांचे राहिले नाही, पूर्णपणे राजकीय झाले”; भीमनवार दोषी आढळल्यास कलम 317 अंतर्गत राष्ट्रपतींकडे हटवण्याची शिफारस करण्याची तयारी
पालघर : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत आंदोलनाच्या सध्याच्या स्वरूपावर जोरदार टीका केली. “उच्च न्यायालयाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरवलेले आहे. तिथे बसता येणार नाही, असे म्हटले आहे. तरीही उच्च न्यायालयाचा अवमान करून ते तिथे बसलेले आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
पत्रकारांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, ज्या काळात पेपरफुटीच्या घटना घडल्या, त्या वेळी भीमनवार आयोगाचे अध्यक्ष नव्हते. ते पेपरफुटीनंतर पदावर आले. त्यामुळे मागील काळातील घटनांसाठी त्यांचा थेट राजीनामा कसा घेता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फडणवीस म्हणाले, “विद्यार्थ्यांना हे सांगण्यात आले आहे की ते ज्या अध्यक्षांचा राजीनामा मागत आहेत, ज्यावेळी पेपरफूट झाली त्यावेळी ते अध्यक्ष नव्हते. ते जॉईनही झाले नव्हते. पेपरफुटीनंतर ते जॉईन झाले, तर मागच्या काळाकरता त्यांचा राजीनामा थेट कसा घेता येईल?”
सरकार न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी करण्यास तयार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. या चौकशीत सध्याचे अध्यक्ष, पूर्वीचे पदाधिकारी किंवा अन्य अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
“त्या चौकशीत हे अध्यक्ष असतील, जुने कोणी असतील, अजून कोणी अधिकारी असतील, जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करायला तयार आहोत,” असे ते म्हणाले.
“राजीनामा घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही”
MPSC अध्यक्षांना थेट पदावरून हटवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“राजीनामा घेण्याचा अधिकार शासनाला नाही. समजा त्यांना काढायचे झाले तरी तो अधिकार राष्ट्रपतींना आहे. राज्य सरकारला तो अधिकार नाही,” असे त्यांनी सांगितले.
चौकशीत भीमनवार दोषी आढळल्यास संविधानातील कलम 317 नुसार त्यांना हटवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“जो त्या काळात नव्हताच त्याच्यावरही आम्ही चौकशी लावायला तयार आहोत. त्याचा काही दोष निघाला तर 317 प्रमाणे त्यांना हटवा, अशी राष्ट्रपतींना शिफारस करू,” असे फडणवीस म्हणाले.
“आंदोलन आता राजकीय झाले”
पुण्यातील आंदोलनाच्या सध्याच्या स्वरूपावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “हे आंदोलन सुरुवातीला MPSC विद्यार्थ्यांचे होते. आता ते विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिलेले नाही. ते पूर्णपणे राजकीय आंदोलन झाले आहे. एका इव्हेंटसारखे ते सुरू आहे.”
तरीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
“आमचा प्रयत्न मुलांना न्याय कसा द्यायचा, त्यांच्या प्रश्नांवर मार्ग कसा काढायचा हा आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

