‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ चे उद्घाटन संपन्न.
पुणे, दिनांक, ८ ऑक्टोबर: अलीकडच्या काळात सिंथेटिक आणि प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणासाठी हानिकारक बनला आहे, तागापासून तयार केलेल्या वस्तू या पर्यावरणपूरक ठरत असून त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळणे शक्य असल्याचे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशी भूषण सिंह यांनी गुरुवारी व्यक्त केले.
शिखाज् कारीगरी आणि केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ चे उदघाट्न त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पुण्याच्या विभागीय आयुक्त शीतल बसवराज तेली उगले, पुणे क्लस्टर, एसईझेडच्या सह-विकास आयुक्त मितल सुधीर हिरेमठ, सीआयडीचे महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, राष्ट्रीय ताग मंडळाचे संचालक किशन सिंग घुघत्याल, सदर्न कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, अभिनेत्री सायली पाटील, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ नॅचरोपॅथीच्या संचालिका गीता बाळकृष्ण शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान बंड गार्डन रोड वरील पूना क्लब इथे याचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी तागापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामधून नॅचरल फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामध्ये कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण अजिबात नाही. एक हेकटर तागाच्या शेतीमधून ११ टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाते, त्यामुळे भविष्याचा विचार करता ताग हे खूपच ठरणार आहे. देशवासीयांनी त्याचा अधिकाधिक वापर केला तर पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी ते अधिक फायदेही ठरणार असल्याचे शशी भूषण सिंह यावेळी म्हणाले.
पुणे हे कला आणि विद्येचे माहेरघर आहे, त्यामुळे या प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या कलाकृतींच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, या प्रदर्शनात ११० पेक्षा अधिक स्टॉल असून त्यामध्ये पारंपरिक भारतीय कला आणि हस्तकलेशी निगडित अनेक वस्तू उपलब्ध असल्याचे शीतल तेली यावेळी म्हणाल्या.
आपला देश हा विविध कलानी भरलेला आहे, त्यामुळे देशाच्या विविध भागात तयार होणाऱ्या कलाकृतींना या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळाले असल्याचे सायली पाटील यावेळी म्हणाल्या. भारतीय हस्तकला आणि पारंपरिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याबरोबरच उद्योजक, कारागीर, डिझायनर्स, विद्यार्थी आणि ग्राहक यांना एकत्र आणणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
श्री.अंकुश चव्हाण यांनी आभार मानेल.

