“भेट देण्याचा शब्द दिला होता; आता ती भेट कायमची अपूर्ण राहिली”
पुणे : ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक प्रश्नांवर परखड भूमिका मांडणारे नाना पाटेकर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार भावुक झाले. पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नाना पाटेकर भेट देणार होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
रोहित पवार म्हणाले, अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वी एका मित्राच्या माध्यमातून नाना पाटेकर यांच्याशी त्यांचे बोलणे झाले होते. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन हक्काचे असल्याचे सांगत त्यांनी नानांना आंदोलनस्थळी येण्याची विनंती केली होती.
त्यावर नाना पाटेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “मी सध्या थोडा बाहेर आहे. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन पुढेही सुरू राहिले, तर पुढच्या तीन-चार दिवसांत नक्की येईन,” असा शब्द दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
मात्र आज सकाळी नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ही भेट आता कधीच होऊ शकणार नाही, याची खंत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
“मनात एक आणि ओठात एक कधीच नसायचे”
नाना पाटेकर यांच्या स्पष्टवक्तेपणाची आठवण सांगताना रोहित पवार म्हणाले की, सामाजिक क्षेत्र असो किंवा कलाक्षेत्र, नानांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या मनात एक आणि ओठात एक असे कधीच नसायचे.
नाना पाटेकर यांच्याशी अनेकदा जवळून चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. पवार कुटुंबाशी नानांचे जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांचे नेहमीच बोलणे आणि भेटीगाठी होत असत, तर अजित पवार यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध होते, असे रोहित पवार म्हणाले.
“महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे मोठे नुकसान”
‘प्रहार’ आणि ‘खामोशी’सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी समाजाला दिलेला संदेश कायम स्मरणात राहील, असे रोहित पवार म्हणाले.
“नानांच्या जाण्याने महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या परिवारासोबत आहोत,” अशा शब्दांत त्यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

