गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; संवेदनशील, अष्टपैलू आणि करारी अभिनेता हरपल्याची राजकीय नेत्यांकडून भावना
पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील निवासस्थानी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली; मात्र त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.
नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील भोर परिसरातील डोणजे येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठी रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा विचार करून त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी — नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि वैशिष्ट्यपूर्ण संवादशैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे गडकरी म्हणाले.
‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जलसंधारण, पाणी संवर्धन आणि शेतकरी कुटुंबांसाठी केलेल्या त्यांच्या कार्याचाही गडकरी यांनी उल्लेख केला. “नाना एक उत्तम कलाकार असण्याबरोबरच समाजाप्रती अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे,” असे त्यांनी म्हटले.
“नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनानेही मोठे” — देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाला “अचानक आणि मनाला मोठा धक्का देणारी एक्झिट” असे संबोधले.
“नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनानेही मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. ‘क्रांतिवीर’पासून ‘नटसम्राट’पर्यंत त्यांनी उभा केलेला अभिनयाचा पट विलक्षण होता,” अशा शब्दांत फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.
जलयुक्त शिवार अभियानाला नाना पाटेकर यांनी दिलेल्या पाठिंब्याची आठवणही त्यांनी सांगितली. मकरंद अनासपुरे यांच्यासह ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना करून शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांसाठी प्रत्यक्ष शिवारात उतरून काम करणारा हळवा माणूस आपण नानांमध्ये पाहिला, असे फडणवीस म्हणाले.
“अभिनयाचा एक युगपुरुष हरपला” — सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. “अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेला एक युगपुरुष हरपला,” असे त्यांनी म्हटले.
‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘परिंदा’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील. समाजातील वंचित घटक आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्यही प्रेरणादायी राहील, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
“अष्टपैलू कलाकार गमावला” — रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाला अत्यंत धक्कादायक घटना म्हटले. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या विविध चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाची अमीट छाप सोडल्याचे त्यांनी म्हटले.
पडद्यावरील अभिनयासोबत ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागासाठी केलेले कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारे असल्याचे रोहित पवार म्हणाले.
“सिनेसृष्टीतील नटसम्राटाला देवाज्ञा” — प्रसाद लाड
आमदार प्रसाद लाड यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या दमदार अभिनयासोबतच समाजाशी असलेल्या नात्याचा उल्लेख केला. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या असंख्य व्यक्तिरेखा आणि त्यांचे संवाद रसिकांच्या मनात कायम राहतील, असे त्यांनी म्हटले.
“पडद्यावरचा कलाकार आणि शेतशिवारातला माणूस” — कैलास पाटील
आमदार कैलास पाटील यांनी नानांच्या सामाजिक कार्यावर भर दिला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, जलसंधारण, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे त्यांनी म्हटले.
“अभिनयाचा स्वतंत्र अध्याय संपला” — श्रीकांत शिंदे
खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा एक स्वतंत्र अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली. ‘क्रांतिवीर’मधील प्रखरपणा, ‘परिंदा’तील तीव्रता, ‘प्रहार’मधील सैनिकाचा आवेश, ‘नटसम्राट’मधील वेदना आणि ‘वेलकम’मधील विनोदी अंदाज अशा प्रत्येक भूमिकेला नानांनी स्वतःचा जीव दिला, असे त्यांनी म्हटले.
पडद्यामागेही शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि गरजूंसाठी प्रत्यक्ष काम करणारा संवेदनशील माणूस म्हणून नाना पाटेकर कायम स्मरणात राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नाना पाटेकर यांच्या निधनाने एक दमदार अभिनेता, परखड व्यक्तिमत्त्व आणि समाजाच्या वेदनांशी नाळ जोडलेला संवेदनशील माणूस महाराष्ट्राने गमावला आहे.

