पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आणि सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशारा दिला.
जरांगे पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना शांतता आणि संयम राखावा. आंदोलनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. “तुमचे आई-वडील तुमची घरी वाट पाहत आहेत. मुलाला नोकरी मिळाली तर कुटुंबावर कितीही संकट आले तरी ते त्याला सामोरे जाईल,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
‘विद्यार्थ्यांसाठी सगळा महाराष्ट्र बंद करू’
विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही तर आंदोलनाचा विस्तार करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. “तुमच्यासाठी सारा महाराष्ट्र बंद करू,” असे त्यांनी म्हटले.
याचवेळी त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत, “महाराष्ट्र बंद करण्याची वेळ आली आणि एका दिवसात महाराष्ट्र बंद करता आला नाही तर माझे नाव बदलेन,” असा इशारा सरकारला दिला.
‘हे आंदोलन राजकीय कसं?’
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याच्या आरोपांवरही जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी एखादा नेता किंवा संघटना त्यांच्या बाजूने उभी राहत असेल तर त्याला राजकीय आंदोलन का म्हटले जाते, असा सवाल त्यांनी केला.
“विद्यार्थ्यांना बळ दिलं नाही पाहिजे का? त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवण्यात गैर काय?” असे ते म्हणाले.
‘तिकडे जाऊ नको, असे सकाळपासून फोन’
पुण्यातील आंदोलनाला भेट देऊ नये यासाठी आपल्याला सकाळपासून फोन येत असल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी केला.
“मला सकाळपासून फोन येत आहेत, तिकडे जाऊ नको असे सांगितले जात आहे. मला काय विकत घेतले आहे का?” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
जरांगे पाटील यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावरही टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “राजीनामा द्यावाच लागेल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्देशून त्यांनी, “तुम्ही त्यांचे प्रवक्ते म्हणून काम करता का?” असा सवाल केला. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि आयोगाच्या अध्यक्षांबाबत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘गरिबांच्या मुलांनी अधिकारी होऊ नये का?’
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीचाही जरांगे पाटील यांनी उल्लेख केला. अनेक कुटुंबे आपल्या मुलांनी अधिकारी व्हावे, नोकरी मिळवावी, यासाठी मोठ्या अपेक्षा ठेवून त्यांना शिक्षणासाठी पाठवतात. त्यांच्या स्वप्नांशी खेळू नका, असे आवाहन त्यांनी केले.
गरिबांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांमधून पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षांचा चुराडा होणार नाही, याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, MPSC अध्यक्षांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन सुरू असून विविध राजकीय आणि सामाजिक नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. सरकारने मागण्यांवर तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

