श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; यंदा साधेपणाने आरास
पुणे – अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११११ आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावर्षी कोविडच्या पार्श्र्वभूमीवर मंदिरात साधेपणाने आंब्यांची आरास करण्यात आली.
अक्षय तृतीयेला दरवर्षी मंदिरात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आरास व पुष्परचना करण्यात येते. मात्र, यावर्षी कोविडच्या पार्श्र्वभूमीवर अत्यंत साधेपणाने ही आरास करण्यात आली. देसाई बंधू आंबेवाले चे मंदार देसाई यांनी दरवर्षीप्रमाणे आंबे देऊन श्री चरणी सेवा अर्पण केली.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे आंब्यांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. गणरायाला नैवेद्य दाखवलेला हा आंब्यांचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्ण, पिताश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ आणि खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांना देण्यात येणार आहे. मंदिर बंद असून भाविकांनी ट्रस्टच्या वेबसाइट, फेसबुक व इतर माध्यमांवर ऑनलाईन पध्दतीने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.