पुणे :- यशस्वी होण्यासाठी तुमची पार्श्वभूमी आणि शिक्षणाबरोबरच तुम्ही आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी किती चिकाटीने प्रयत्न करता यालाही तेवढेच महत्त्व आहे. डीएसके आणि प्रदीप लोखंडे हे अशाच काही उदहरणांपैकीच आहेत. आपल्या गरजा पूर्ण झाल्या नंतर राहिलेल्या पैशातून समाजाच्या हितासाठी काहीतरी करण्याचे ठरवले पाहिजे, आपल्या यशाबरोबर आपण समाजाचे देणे लागतो ही ह्या भूमिकेतूनच जगले पाहिजे, असे मत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
डी. एस. कुलकर्णी यांच्या ६५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘डीएसके सेल्फ मेड मॅन २०१५’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. रुरल रिलेशन्सचे संस्थापक संचालक श्री. प्रदीप लोखंडे यांना श्री. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी डीएसके समूहाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, नेस वाडिया कॉलेज चे माजी प्राचार्य वसंत नूलकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे,आमदार मेधा कुलकर्णी तसेच डी. एस.कुलकर्णी फाउंडेशनचे विश्वस्त असीम सरोदे, विवेक वेलणकर, श्याम भुर्के, प्रमोद अडकर,अ. ल. देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी समाजासाठी काम करणाऱ्या ६ स्वयंसेवी संस्थांना व व्यक्तींना फाउंडेशनच्या वतीने डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोक-बिरादरी प्रकल्पाला शाल, श्रीफळ १ लाख रुपये तर विशेष मुलांना सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण देणारे पुण्यातील अंकुर विद्यालय, एचआयव्ही बाधित मुलांचे संगोपन करणारी पंढरपूर येथील पालवी संस्था,डॉ. शिवगुंडे यांची सोलापूर येथील आधार विश्वस्त संस्था, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारी मुंबईची जीवन आनंद संस्था आणि तोरणा राजगड समाजोन्नती न्यास, वेल्हे या संस्थाना जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी २५ हजार रुपये देवून सन्मानित करण्यात आले.
केलेल्या कामाचे कौतुक म्हणून पुरस्कार मिळणे आवश्यक आहे. पण काम करताना पुरस्कारापेक्षा सामाजिक हिताचा विचार करून नकारात्मक गोष्टीबाजूला सारून पुढे जायला हवे. तरुणांनी नोकर्या नाहीत म्हणून रडत रहण्यापेक्षा नवीन संधी साधण्याकडे लक्ष दिले पाहिजे. सातत्य आणि नाविन्य हे माझ्या यशामागचे गमक आहे. अशा भावना प्रदीप लोखंडे यांनी मांडल्या.
शिवतारे म्हणाले , न्यूनगंड बाजूला ठेवून प्रबळ इच्छाशक्ती असलेला व्यक्तीच समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. त्यामुळेच ध्येयवेड होणेच आवश्यक आहे. हयाच निस्वार्थ हेतुतून सेवा घडते.
डी. एस. कुलकर्णी यांनी तरुणांना बिझनेस कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले तर नुलकर यांनी मनोगत आणि प्रास्ताविक श्याम भुर्के यांनी केले. डी. एस. के वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेछा देण्याकरिता त्यांचे ९१ वर्षाचे त्यांचे गुरुवर्य डॉ. गावडे हेही आवर्जून उपस्थित होते.