पुणे : पुणे परिमंडलातील 4 लाख 36 हजार वीजग्राहकांनी गेल्या डिसेंबर महिन्यात तब्बल 84 कोटी 47 लाख रुपयांचा ऑनलाईन वीजदेयक भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईलधारकांसाठी अॅपद्वारे वीजदेयके भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजदेयकांच्या ऑनलाईन भरणाकडे वीजग्राहकांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात ऑनलाईन वीजदेयके ऑनलाईन भरणार्या ग्राहकसंख्या 83 हजारांनी वाढली असून सुमारे 32 कोटी रुपयांनी भरणा वाढलेला आहे. डिसेंबर 2014 मध्ये पुणे परिमंडलात 3 लाख 53 हजार वीजग्राहकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून वीजदेयकांपोटी 52 कोटी 30 लाख रुपयांचा भरणा केला होता.
महावितरणने इंटरनेटद्वारे www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बील पेमेंट सुविधा लघुुदाब वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच महावितरणने ऑगस्ट 2015 मध्ये स्मार्ट मोबाईलधारकांसाठी अॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडीट किंवा डेबीट कार्ड किंवा नेटबंॅकींगद्वारे वीजदेयके भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अॅपवरून वीजदेयके भरणा करण्याकडे ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
गणेशखिंड मंडलमधील ऑनलाईन पेमेंट करणार्या ग्राहकांची संख्या डिसेंबरमध्ये 2 लाख 20 हजारांवर गेली असून त्यांनी 42 कोटी 19 लाखांचा वीजबील भरणा केला आहे. यात सर्वाधिक पिंपरी विभागात 90 हजार 143 ग्राहकांनी 14 कोटी 3 लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केलेला आहे. पुणे परिमंडलात सर्वाधिक ऑनलाईन भरणा पिंपरी विभागात होत आहे, हे विशेष. त्यानंतर शिवाजीनगर विभागात 44 हजार 788 ग्राहकांनी 10 कोटी 42 लाखांचा व भोसरी विभागात 37 हजार 444 वीजग्राहकांनी 9 कोटी 42 लाख रुपयांच्या देयकांचा ऑनलाईन भरणा केला आहे.
रास्तापेठ मंडलमधील एक लाख 81 हजार 126 ग्राहकांनी गेल्या डिसेंबरमध्ये 33 कोटी 10 लाखांच्या देयकांचा ऑनलाईन भरणा केला आहे. यात सर्वाधिक नगररोड विभागात सर्वाधिक 42 हजार 604 वीजग्राहकांनी 7 कोटी 87 लाख रुपयांचा ऑनलाईन वीजबील भरणा केला आहे. याशिवाय पुणे ग्रामीण मंडलातील 35 हजार 408 ग्राहकांनी 9 कोटी 18 लाखांचा ऑनलाईन वीजबील भरणा केला आहे.
वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक ‘ऑनलाईन’ भरणाची सोय उपलब्ध आहे. मुदतीनंतर भरलेल्या देयकाची पावती महावितरणच्या संबंधीत कार्यालयात दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येईल.
महावितरणने वेबसाईट व मोबाईल अॅपवरील ऑनलाईन पेमेंटसोबत ग्राहकांना इमेलद्वारे वीजदेयक प्राप्त करण्याची सोय आहे. किंवा छापील देयकांऐवजी फक्त इमेलद्वारे वीजबील पाहिजे असल्यास गो-ग्रीन हा पर्याय उपलब्ध आहे. गो-ग्रीनमध्ये देयकात तीन रुपयांची सूट दिली जात आहे. याबाबतची सर्व माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.