मराठी मनाचा वेध घेणारी ‘झी टॉकीज’ वाहिनी नेहमीच मराठी प्रेक्षकांना अधिकाधीक नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आली आहे. मनोरंजन व खेळा चा असाच एक आगळा वेगळा धमाका ‘झी टॉकीज’ वाहिनीवर लवकरच पाहायला मिळणार आहे. यंदा पाचगणीत रंगलेल्या ‘महाराष्ट्र कलानिधी’ आयोजित ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ च्या दुसऱ्या पर्वातल्या रंगतदार सामन्यांचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यांचे प्रक्षेपण झी टॉकीजवर येत्या २१ जून व २८ जून ला सांयकाळी ७ वाजता होणार आहे. यातला पहिला भाग २१ जून ला व दुसरा भाग २८ जून ला दाखवण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र कलानिधी’ आयोजित ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ पाचगणीत मोठ्या दिमाखात संपन्न झाली. सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत दहा संघांमध्ये सामने खेळले गेले आणि यात बाजी मारली ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत सर्वच संघांनी एकमेकांना तोडीसतोड टक्कर दिली. विशेष म्हणजे अभिनेत्यांच्या बरोबरीने मराठी अभिनेत्रीनी देखील आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मराठी मनोरंजन विश्वाने क्रिकेटच्या मैदानात ठोकलेल्या चौकार षट्कारांची आतषबाजी आदिनाथ कोठारे, नेहा पेंडसे, स्मिता तांबे, माधव देवचक्के या व इतर कलाकारांचे नृत्याचे जलवे अशा मनोरंजनाच्या दुहेरी धमाक्याचं फूल टू पॅकेजचा आस्वाद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे.
‘झी टॉकीज’ वाहिनीच्या प्रत्येक नवीन गोष्टीला आतापर्यंत प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीला एकत्र आणणा-या महाराष्ट्र कलानिधी आयोजित मराठी बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचे रंगतदार सामने प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करतील.