‘स्माईल’ संस्थेच्या वतीने चेंजमेकर्सच्या उपक्रमांतर्गत महिलांसाठी ‘नेतृत्व विकसन कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पुण्यातील विविध भागातून 90 महिला सहभागी झाल्या होत्या. ही कार्यशाळा इंद्रधनुष्य हॉल, सचिन तेंडुलकर उद्यानाजवळ, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल, पुणे येथे नुकतीच पार पडली. चेंजमेकर्सच्या उपक्रमातील महिलांसाठी घेण्यात आलेली तिसरी कार्यशाळा होती.
‘स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणण्याची महिलांची, नागरिकांची शक्ती लक्षात घेवून त्यातून स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे,’ असे मार्गदर्शपर बोलताना खासदार अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या.
‘चेंजमेकर्स’च्या प्रमुख समन्वयक नीला विद्वांस यांनी या कार्यशाळेत महिलांना गटप्रशिक्षण, गट प्रमुखांची निवड कशी करावी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागते, स्वत:मध्ये नेतृत्व गुण विकसित करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी विविध उपक्रमांची माहिती स्लाईड शो द्वारे देण्यात आली. चेंजमेकर्सच्या समन्वयक संजिवनी जोगळेकर यांनी महिलांना प्रात्यक्षिकाद्वारे विविध खेळांचे, आणि उपक्रमाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांनी आपले अनुभव सांगितले.
प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला पुण्यातील सिंहगड रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, भवानी पेठ, कोंढवा -वानवडी परिसर या विभागातून आल्या होत्या.
यावेळी शशिकला कुंभार, पद्मा कांबळे, शीतल कुंभार, मीना पवार आदी महिला उपस्थित होत्या.
‘छोटी छोटी पावले मोठे बदल घडवून आणतात, यावर विश्वास असणार्या नागरिकांसाठी ‘चेंजमेकर्स’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे. आपण बदल घडवू शकतो, याचा अनुभव या उपक्रमात सहभागी झालेला प्रत्येकजण अनुभवेल. सरकारच्या बरोबरीने प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्थानिक पातळीवर पाऊले उचलणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम पुण्यात सुरू केला आहे, असेही खा.वंदना चव्हाण यांनी सांगितले.