पुणे:
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’(‘डायल 108’ ) सेवेच्या पुण्यातील औंध येथील रिस्पॉन्स सेंटरला अलीकडेच सदिच्छा भेट दिली. बी. व्ही. जी. संचालित आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डायल 108) चे हे केंद्र ‘औंध उरो रुग्णालय’ येथे आहे. येथे त्यांनी या सेवेचे सादरीकरण पाहिले.
‘बीव्हीजी इंडिया लि.’चे अध्यक्ष एच.आर. गायकवाड, उपाध्यक्षउमेश माने यांनी देसाई यांचे स्वागत केले.
‘डायल 108’ सेवेला येत्या 26 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षात या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा सुमारे पावणे दोन लाख रुग्णांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही आपत्कालीन वेद्यकिय सेवा कशाप्रकारे चालविली जाते याची माहिती घेतली आणि अत्याधुनिक रुग्णवाहिकेची पाहणी करून त्याबाबत अधिक माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणारी ‘महाराष्ट्र मेडीकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ ही आपत्कालीन सेवा अतिशय उपयुक्त आहे. या आपत्कालीन वेद्यकिय सेवेचा इतर राज्यातील गरजू रुग्णांना फायदा मिळण्यासाठी प्रसार होणे आवश्यक आहे.’
यावेळी संस्थेचे संचालक गणेश लिमये, सचिव संजीव महाजन, मनुष्यबळ विभाग प्रमुख धैर्यशील काळे, औंध जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढवळे उपस्थित होते.