पुणे: दिघी येथील दीपमाया इंडस्ट्रीज व त्यावरील रहिवासी इमारतीमधील 40 खोल्यांमध्ये थेट मिनी फिडर पिलरमधून सुरु असलेली 14 लाख 68 हजार रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी बुधवारी (दि. 23) महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत दिघी येथील गायकवाडनगरमध्ये माया प्रदीप दिघे यांच्या मालकीच्या दीपमाया इंडस्ट्रीजला औद्योगिक वीजजोडणी देण्यात आली आहे. या इंडस्ट्रीजच्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर 40 खोल्या आहेत. वीजवापराच्या विश्लेषणातून संशय निर्माण होत असल्याने या इंडस्ट्रीजमधील वीजयंत्रणेची महावितरणकडून पाहणी करण्यात आली. यात अत्यंत छुप्या पद्धतीने वीजचोरी केल्याचे दिसून आले. दीपमाया इंडस्ट्रीजसमोर असलेल्या महावितरणच्या मिनी फिडर पिलरमधून वेगळी अनधिकृत केबल इमारतीमधील घरगुती वापरासाठी असलेल्या खोलीत व तेथून इंडस्ट्रीजच्या वीजयंत्रणेला जोडण्यात आल्याचे दिसून आले. मिनी फिडर पिलरमधून थेट वीजचोरी करण्यासाठी अनधिकृत वीजयंत्रणा लावल्याचे आढळून आले. यात इंडस्ट्रीजमधील वीजवापरासाठी 65,190 युनिटची म्हणजे 8 लाख 53 हजार 350 रुपयांची तर या इमारतीमधील 40 खोल्यांतील वीजवापरासाठी 30,942 युनिटची म्हणजे 6 लाख 15 हजार 120 रुपये अशी एकूण 14 लाख 68 हजार 470 रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले.
अत्यंत छुप्या रितीने सुरु असलेली वीजचोरी उघड करण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप गिरी, सहाय्यक अभियंता रमेश सुळ, शितल बोथे, अंजली हिरे तसेच चंद्गकांत मोहरे, तुळशीराम गवळी, कृष्णा गायकवाड, चंद्गकांत वाडेकर, नामदेव आढे, संजय नायकवडी, महेश वाघमारे, अतुल वाळूंज, शुभांगी मुचुंडे, राहुल घाटोळ, आशिष झोपे आदींनी योगदान दिले.
वीजचोरीप्रकरणी मेसर्स दीपमाया इंडस्ट्रीजविरुद्ध बुधवारी (दि. 23) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.