जयपूर – राजस्थानमधील दौसा येथे भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या मर्सिडीझ गाडीने एका अल्टो कारला जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या या अपघातात ४ वर्षाच्या सोनम या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि हेमा मालिनी यांच्यासह ५ जण जखमी झाले. हेमा मालिनी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर जयपूर येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.दरम्यान, याप्रकरणी हेमा मालिनी यांच्या मर्सिडीजचा चालक महेश ठाकूरला पोलिसांनी आज अटक केली.
हा अपघात काल रात्री ८.५५ वाजता झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिका-यांनी भेट दिली. अल्टो कारमध्ये असलेल्या दीडवर्षीय चिन्नी खंडेलवाल हिचा मृत्यू झाला आहे. या अपघातात या मुलीचे वडील हनुमान (30), आई शिखा (28), भाऊ शोमिल (4) आणि सीमा (45) हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्टो कारमध्ये जाणारे हेे कुटुंब जयपूरहून लालसोटकडे जात होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी ट्विटद्वारे दुःख व्यक्त केले आहे.
हेमा मालिनी त्यांच्या मर्सिडीझ कारमध्ये मेहंदीपूर बालाजीचे दर्शन घेऊन मथुरेला जात होत्या. त्यावेळी जयपूर-आग्रा हायवेवर दौसा येथे समोरून येणाऱ्या अल्टो कारबरोबर त्यांच्या गाडीची जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेमा मालिनी यांच्या डोक्याबरोबरच त्यांच्या पायाला आणि हातालाही जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी जयपूरच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेमा मालिनी यांची प्रकृती स्थिर असल्याचे फोर्टिस हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले. प्लास्टिक सर्जन डॉ. संदीपन मुकुल आणि न्युरो सर्जन हेमंत भारतीय यांच्या नेतृत्वाखाली एक टीम हेमा मालिनी यांच्यावर उपचार करत आहे. अपघात होताक्षणी एअरबॅग उघडल्यामुळे हेमा मालिनी यांना मोठी दुखापत झाली नाही. मात्र डोक्याच्या उजव्या बाजूला कपाळावर जोरात मार लागल्याने त्या भागातून सतत रक्त येत होते. हा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने उपाय सुरु केले आहेत. हेमा मालिनी यांच्या डोळा आणि नाकालाही जबर मार लागला आहे. हेमा मालिनींचे कुटुंबीय जयपूरमध्ये आज पोहोचणार आहेत.
अशी माहिती दौसाचे जिल्हाधिकारी स्वरूप पवार यांनी दिली. हेमा मालिनी यांचा ड्रायव्हर अती वेगाने कार चालवत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तर अल्टो चुकीच्या दिशेने पुढे आल्याने अपघात झाला असे काहींचे म्हणणे आहे. दौसाचे पोलिस अधीक्षक अंशुमान भौमिया यांनी सांगितले, की ओव्हरस्पीडमुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे. कारण अल्टो कार चालकाच्या म्हणण्यानूसार वळणावर त्याला कोणतेही वाहन येत असल्याचे दिसले नव्हते.
हेमा मालिनींच्या कारच्या धडकेने चिमुकलीचा मृत्यू, ड्रायव्हर अटकेत, हेमामालिनीही जखमी
Date: