बीड जिल्ह्यातील पात्रुड येथे उभारण्यात आलेल्या चारा छावणीच्या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, गुरांना चारा मिळावा म्हणून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एखाद्या तालुक्यात चारा नसेल तर जिल्ह्यातून तेथे चारा उपलब्ध करुन दिला जाईल. जिल्ह्यात चारा नसेल तर बाहेरील जिल्ह्यातून चारा उपलब्ध करून दिला जाईल. वेळ पडल्यास बाहेरच्या राज्यातूनही चारा आणून जनावरांचे पोषण केले जाईल. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी देखील 10 टक्के अतिरिक्त तरतूद उपलब्ध करुन दिली आहे. चारा छावण्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून शासनाने चारा छावणी नियम केले आहेत. त्यामुळे चारा छावणीतील गैरप्रकारास आळा बसून जनावरे जगतील. बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे. चारा छावणीला जोडून पशु पालकांना चारा निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे. हायड्रोफोनिक तंत्राद्वारे हिरवागार चारा तसेच अझोला शेवाळ या चाऱ्याचे संगोपन कसे करावे, कडबा-कुटाराला पौष्टिक कसे बनवावे, याचे मार्गदर्शन या चारा छावण्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागामार्फत केले जाते.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित शेती करावी लागेल. येत्या काळात दीड लाख शेततळी निर्माण करावयाची आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या स्वत:च्या शेतात जलसंवर्धनाचे काम केल्यास त्यांना रोजगार हमी योजनेतून पैसे दिले जातील. ऊसतोड कामगार, शेतमजूर, शेतकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून बीड जिल्ह्यातील दोन लाख मजुरांना 100 दिवसाचा रोजगार दिला जाईल. शेतकऱ्यांच्या संबंधित वीज बील असो वा पीक कर्ज माफी असो त्यासाठी जो निधी लागेल तो देण्याचे ठरविले आहे. वेळ पडल्यास राज्य शासन कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे हित साध्य करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्रीमती मुंडे म्हणाल्या, माजलगाव प्रकल्पात पाणी कमी असल्याने जायकवाडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे या परिसरातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठीचा प्रश्न सुटेल. लोकांच्या हातांना काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामे हाती घेण्याची धडक योजना सुरू केली जात आहे.
प्रारंभी येथे उभारण्यात आलेल्या चारा छावणीस मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी आदी उपस्थित होते.
पात्रुड येथे उभारण्यात आलेल्या चारा छावणीत पात्रुड परिसरातील ढोरगाव, आनंदगाव, लोणगाव, भगवाननगर, लाऊळ, हिंगणवाडी, आंबेगाव, छोटीवाडी, बोरगाव, मोठीवाडी, शिंदेवाडी, राजेवाडी इत्यादी गावातील जनावरे दाखल झाली आहेत. दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आदर्श शेतकरी विनायक शिंदे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.