पुणे- भोर तालुक्याच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावरील एका वाडीत राहणाऱ्या १५ वर्षाच्या विद्यार्थिनीने प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्यामुळे पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता शिंदेवाडी येथे तिने पेटवून घेतले असून, तिच्या घरच्यांनी मृत्यूची माहिती पोलिसांना न देता तिच्यावर अंतिम संस्कार केले. पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर अंत्यविधी उरकण्यात आल्यामुळे प्रकरणाबाबत संशय वाढला आहे याविषयी राजगड पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. मात्र पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगितले आहे.
प्राजक्ता (वय १५) असे पेटवून घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेत भाजून तिचा मृत्यू झाला. गुरुवारी या परिसरात या प्रकाराची वार्ता पसरल्यामुळे तेथे ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राजक्ता इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. घराशेजारी राहणारा तरुण रवि (वय २१) या तरुणासोबत तिचे गेल्या दीड महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाला तिच्या आईवडिलांचा विरोध होता आणि त्यांनी प्राजक्ताला प्रेमप्रकरण संपवण्याबाबत दोन-तीन वेळा समज दिली होती.रवि हा एका खासगी कंपनीत नोकरी करीत असून, बुधवारी सायंकाळी ते एकमेकांशी गप्पा मारत बसले होते. हे प्राजक्ताच्या आईने पाहिले. यानंतर तिने रविच्या कुटुंबीयांना घरी बोलावून घेतले होते. त्यांनी प्राजक्ताला हे वय प्रेम करण्याचे नसून वयात आल्यानंतर लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले. ही चर्चा सुरू असतानाच प्राजक्ता शेजारच्या खोलीत गेली आणि तिने अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली व रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर तिच्या आईवडिलांनी याची माहिती पोलिसांना देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी कोणालाही काही न सांगता त्याच रात्री साडेबारा वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
विद्यार्थिनीची पेटवून घेऊन आत्महत्या
Date: