प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांच्या वर्षपूर्ती कार्यअहवाल 2014-15 चे प्रकाशन
औरंगाबाद :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचा जिल्हा-शहर, तालुका पदाधिकारी, जि.प., पं. स. गट-गण सदस्यांचा राज्यस्तरीय मेळावा 9 ऑगस्ट रोजी (रविवार) औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, रासप प्रदेश उपाध्यक्ष दशरथ राऊत, महासचिव बाळासाहेब दोडतले, सचिव कैलास कोळसे-पाटील यांच्या हस्ते प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांच्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची वर्षपूर्ती कार्यअहवाल 2014-15 चे प्रकाशन करण्यात आले. हा मेळावा ११ ते ६ वाजता गजानन महाराज मंदिराजवळील राधाकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला.
प्रकाशन प्रसंगी मान्यवरांनी बुद्धिजीवी वर्ग राजकारणात येत असल्याचे स्वागत केले आणि दीपक बिडकर यांचे योगदान पक्षाला उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
या मेळाव्यामध्ये युवक प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड, महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातांब्रेकर, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष डॉ. उज्वला हाके, प्रा. भास्कर टेकाळे, अल्प संख्या आघाडीचे ताजुद्दीन मणेर उपस्थित होते.
2015-16 हे वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाने संघटनशक्ती वर्ष घोषित केले आहे. संघटन मजबूत करण्यासाठी शहर, जिल्हा-तालुका-गाव पातळीवर कार्यकारिणी स्थापन केली जात आहे. या संघटन उपक्रमातील पुढील दिशा या मेळाव्यात जाहीर करण्यात आली.