सातारा (जि.मा.का) : महाराष्ट्र बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासत 40 महिलांचा विमा स्वखर्चातून उतरवून एक प्रकारे रक्षाबंधनाची भेटच दिली आहे. शासनाच्या सर्व योजना प्रभाविपणे राबवत महाराष्ट्र बँकेने स्नहेबंधनातही अग्रेसर वाटचाल ठेवली आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी काढले.
येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रमुख कार्यालयामध्ये स्नेहबंधन योजना ठेव पावतीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण तसेच पंतप्रधान मुद्रा योजनेचे भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन.एल. थाडे, अचंल प्रबंधक अहिलाजी थोरात, मुख्य प्रबंधक रणजित कुमार आदी उपस्थित होते.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून निधी जमवून 40 महिलांचा विमा स्नेहबंधन योजनेंतर्गत उतरविला. याचे स्वागत आणि अभिनंदन करुन जिल्हाधिकारी श्री. मुद्गल पुढे म्हणाले, केंद्र शासनाने सर्वसामान्य लोकांसाठी खूप चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत. सकारात्मक भूमिका ठेवून या योजनांची अंमलबजावणी प्रभाविपणे करुन सामान्य माणसाला उर्जा देण्याचे काम बँक ऑफ महाराष्ट्रने केले आहे. जनधन योजनेमध्ये राज्यात 96 टक्के खाती उघडून बँक आघाडीवर आहे. शासनाच्या सर्वच योजनांच्या अंमलबजावणीत बँक ऑफ महाराष्ट्र आघाडीवर आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर स्नेहबंधन योजना कार्यान्वीत करुन बँकेने खूप चांगली भेट दिली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा. ही योजना उपयुक्त ठरेल.
कौशल्य विकासावर आधारित स्वयंरोजगाराला पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना निश्चितपणे यशस्वी ठरेल. या योजनेचा प्रभाविपणे अंमलबजावणी झाल्यास येत्या 5 ते 10 वर्षात जिल्ह्यातील परिस्थिती बदलेल इतकी क्षमता यामध्ये आहे. या दिशेने निश्चिपणे अग्रणी बँक वाटचाल करेल यात शंका नाही. राज्यामध्ये शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यामध्ये अग्रणी बँक आघाडीवर आहे. बँकेच्या या वाटचालीस मी भरभरुन शुभेच्छा देतो, असेही ते शेवटी म्हणाले.
या योजनेची माहिती देऊन श्री. थोरात म्हणाले, प्रत्येकाने 1 हजार रुपये निधी जमवून 40 महिलांचा प्रत्येकी 2 लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासताना स्वत:पासून सुरुवात करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. यापुढेही शासनाच्या विविध विभागामार्फत प्रशिक्षण दिलेल्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र निश्चितपणे पाठपुरावा करेल. यावेळी श्री. थाडे यांनीही बँकेला शुभेच्छा देत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सदर बीसीद्वारे जास्ती जास्त प्रभाविपणे कार्य राबविल्याबद्दल बारट्रोनिक्स प्रा.लि.चे समन्वयक जोतीराम देशमुख, वकरंगी प्रा.लि.चे रोहण सूर्यवंशी, अविनाश कुंभार यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केदार स्वामी यांनी तर राजीव कदम यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्राची देशमुख, आर.पी. कदम, विजय पाटील, सुनील कुलकर्णी, श्री. मोकाशी, श्री. उदगणी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बँकेची ‘स्नेहबंधन’ वाटचाल – अश्विन मुद्गल
Date: