मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील मॅडिसन चौकातील भाषण वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्याच्या प्रकाराला पेड न्यूज मानले जावे, अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.भाजपने रविवारी विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन मोदी यांचे भाषण रविवारी व सोमवारी विविध मराठी वृत्तवाहिन्यांवर पाहण्याचे आवाहन केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने आयोगाकडे पत्र पाठवले असून त्यात या भाषणाबाबत तक्रार केली आहे. मोदी यांचे भाषण लाइव्ह दाखवले जात नसून ते आता पुनर्प्रक्षेपित होतेय. त्यामुळे तिला पेड न्यूज ठरवले जावे, अशी मागणी काँग्रेसने आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.
कोणतीही वृत्तवाहिनी एखाद्या नेत्याचे भाषण अर्धा -अर्धा तास दाखवत नाही. त्यामुळे मोदींचे भाषण हे स्पष्टपणे पेड न्यूजच आहे. मोदी यांचा अमेरिका दौरा हा केंद्र सरकारच्या खर्चाने झाला होता. त्यांना मिळालेल्या सुविधा वा स्वागत हे पंतप्रधान म्हणून मिळाले. त्यामुळे पंतप्रधान म्हणून केलेले भाषण हे एखाद्या पक्षाच्या प्रचारासाठी वापरणे चुकीचे असून हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे,’अशी तक्रार काँग्रेसने केली आहे.
पंतप्रधान म्हणून केलेले भाषण अशा राजकीय प्रचारात वापरण्यास आडकाठी केली नाही तर उद्या लाल किल्ल्यावरून केलेल्या वा संसदेत केलेल्या भाषणाचा वापरही राजकीय प्रचारासाठी करतील,अशी भीतीही काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मोदींच्या भाषणाचे वाहिन्यांवरील प्रक्षेपण पेड न्यूज ठरवा’
Date: