‘नटसम्राट’ अवतरणार रुपेरी पडद्यावर

Date:

अभिनेते नाना पाटेकरांच्या गहिवरल्या आवाजात उद्गारलेल्या ‘जगावं की मरावं… हा एकच सवाल’ या संवादाने उपस्थित मान्यवर आणि नाशिककरांना अश्रू अनावर झाले होते. निमित्त होतं ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या मुहूर्ताचं. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या अलौकिक प्रतिभेनं विस्तारलेलं मराठीतील एकमेवाद्वितीय नाटक म्हणजेच ‘नटसम्राट’ला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत चित्रपटरुपी माध्यमांतराने दिलेली ही अनोखी मानवंदनाच ठरली. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानात रंगलेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी अभिनेते नाना पाटेकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते सुनील बर्वे, अभिनेत्री मेधा मांजरेकर, नेहा पेंडसे, संगीतकार अजित परब, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि सल्लागार हेमंत टकले उपस्थित होते. फिनक्राफ्ट मिडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि., गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट प्रस्तुत विश्वास विनायक जोशी, नाना गजानन पाटेकर निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट लवकरच रसिक-प्रेक्षकांकरिता घेऊन येत आहेत.   जबरदस्त संहिता, मर्मभेदी संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी असलेल्या ‘नटसम्राट’ने मराठी नाट्यसृष्टीत एक अनोखी उंची गाठली आहे. डॉ श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा अनेक प्रतिभावंतांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर गणपतराव बेलवलकरांची भूमिका जगलीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘नटसम्राट’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे. अष्टपैलू कलावंत नाना पाटेकरांच्या अभिनयाद्वारे ७०च्या दशकातील गणपतराव बेलवलकर हे पात्रं पुनरुज्जीवीत होणार आहे. नाना पाटेकरांची प्रथम निर्मिती असलेल्या ‘नटसम्राट’ विषयी बोलताना आपल्या जुन्या ऋणानुबंधांच्या आठवणी सांगितल्या. “१९७० मध्ये ‘नटसम्राट’ नाटक रंगमंचावर आलं तेव्हा मी जेमतेम २० वर्षांचा होतो पण त्याचवेळी हे नाटक एक मापदंड म्हणून मान्यता पावलेलं होतं. त्यावेळी डॉ श्रीराम लागू, दत्ता भट यांनी साकारलेल्या भूमिका काळजात रुतून बसल्या होत्या. नटसम्राट करायला मिळेल असं माझ्यातल्या नटाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आत्ता आप्पासाहेब बेलवलकर यांची अजरामर भूमिका खुणावत असतानाच महेश मांजरेकरांनी ही संधी मला दिली. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे.” असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. ‘कुणी घर देतं का घर’ असे थेट विचारत प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे ‘नटसम्राट’ गणपतराव उर्फ आप्पासाहेब बेलवलकर या पात्राने ७० चा दशक खऱ्या अर्थाने गाजवला. दशकं लोटली पण या नाटकाचे नावीन्य अजूनही ओसरलेले नाही हीच बाब दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी नेमकी हेरली. “मराठी साहित्यविश्व आणि रंगभूमीवर दबदबा निर्माण करणारी ‘नटसम्राट’ ही अजोड कलाकृती असून त्यावर चित्रपट काढणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. कुसुमाग्रजांनी मांडलेली एका नटसम्राटाची कैफियत चित्रपटात मांडणं कठीण आहे. माध्यमांतर करताना मूळ नाटक आणि संहितेला धक्का न लागता ‘नटसम्राट’ चित्रपटात रुपांतरीत करण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आहे.” असे मत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यावेळी व्यक्त केले. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या या जबरदस्त संहितेची भुरळ कोणाला पडली नसती तरच नवल. ही संधी लेखक किरण यज्ञोपवित यांना लाभली असून त्यांनी ‘नटसम्राट’चे संवाद लिहिले आहेत.आपल्या दर्जेदार अभिनयाने अजरामर केलेल्या ‘नटसम्राट’ नाटकातील भूमिकांना न्याय देण्याकरिता तितक्याच तोडीचे मातब्बर कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नाना पाटेकर, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, रीमा, सुनील बर्वे, नेहा पेंडसे यांसारखे दिग्गज पहिल्यांदाच नटसम्राटच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत. ‘नटसम्राट’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंटचे अनिरुद्ध देशपांडे यांची मोलाची मदत लाभली आहे. To Be or Not To Be’, ‘जगावं की मरावं’, ‘कुणी घर देतं का घर…?’ असे काळजाला हात घालणारे संवाद, टाळ्यांचा गजर, साश्रू नयनांनी ‘नटसम्राट’ला रसिकांनी दिलेली मानवंदना लवकरच रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘नटसम्राट’च्या चित्रीकरणाला येत्या ४ मार्चपासून मुंबईत सुरुवात होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया कार रॅलीच्या नवव्या आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली, २३ मार्च २०२५ : संसद सदस्यांसाठी प्रतिष्ठित जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन...

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवाला लोकसंस्कृतीचा कलाविष्कार – आ. उमा खापरे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक...

राजकुमार ठाकूर यांनी मिळविला सहस्रबुद्धे चषक कॅरम स्पर्धेत विजय आणि ठरले चषकाचे मानकरी

पुणेपटवर्धन बाग येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या एरंडवणे...