Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दिवाळीचा संगीतमय नजराणा ‘कट्यार काळजात घुसली’.. एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स आता झी स्टुडिओज्

Date:

 

महाराष्ट्राला संगीत नाटकांची परंपरा लाभली आहे आणि त्यातील एक अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुमधुर संगीताने सजलेल्या आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ह्या नाटकाने इतिहास घडवला. संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक सर्वार्थाने अजरामर आहे आणि हेच नाटक आता भव्य रूपात चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी स्टुडीओज् आणि श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्मस् यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि हिंदीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना आपल्या संगीताने चार चॉंद लावणारं शंकर एहसान लॉय हे त्रिकूट या निमित्ताने मराठीत पदार्पण करीत आहे हे विशेष.

या दिवाळीची संगीतमय भेट असणा-या ‘कट्यार काळजात घुसली’च्या संगीत प्रकाशनाचा रंगतदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी शंकर-एहसान-लॉय यांच्यासोबत झी स्टुडिओजचे संस्थापक नितिन केणी, बिझनेस हेड निखिल साने, चित्रपटाचे गीतकार, गायक, तंत्रज्ञ आणि कलाकार उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना शंकर महादेवन म्हणाले की, ” मराठीशी आणि महाराष्ट्राशी माझं एक भावनिक नातं आहे. माझी नाळ या मातीशी आणि येथील कलेशी जोडलेली आहे. मराठी संगीत, नाट्यसंगीत यावर मी जीवापाड प्रेम करतो. यामुळेच जेव्हा सुबोधने कट्यारच्या संगीत दिग्दर्शनाबद्दल माझ्याकडे विचारणा केली तेव्हा मला मनोमन आनंद झाला. मला गुरूस्थानी असलेले पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या बहारदार संगीताने अजरामर झालेल्या नाटकावर आधारित या चित्रपटाला संगीत देणं हे मोठं आव्हान होतं. पावित्र्य हा कट्यारच्या संगीताचा आत्मा आहे. अभिषेकी बुवांच्या मूळ रचनांना धक्का न लागू देता हे पावित्र्य जपण्य़ाचा प्रयत्न आम्ही केला आहे. या चित्रपटाचं संगीत ही आमच्यातर्फे अभिषेकीबुवांना वाहिलेली सांगीतिक आदरांजली आहे असं मी मानतो.” तर त्यांचे सहसंगीतकार एहसान नुरानी म्हणाले की, “शास्त्रीय संगीताला आज परदेशात मानाच्या पायघड्या घातल्या जात असताना आपल्याकडे मात्र याबद्दल काहीशी अनास्था बघायला मिळते. परंतु मला आजच्या तरूणाईवर विश्वास आहे. ही युवा पिढी संगीताबद्दल अतिशय सजग आहे. त्यांना चांगलं आणि वाईट संगीत यातील फरक कळतो. त्यामुळे कट्यारच्या माध्यमातून ही पिढीही या संगीताचा आनंद घेईल याची मला पुरेपूर खात्री आहे. तर लॉय मेंडोसा म्हणाले की, “आपल्याला कायम पाश्चात्य आणि रॉक संगीताचं आकर्षण असतं. त्या संगीताच्या तुलनेत आपलं शास्त्रीय संगीत अतिशय सकस आणि दर्जेदार आहे. आम्ही आजवर अनेक चित्रपटांना संगीत दिलं परंतू पूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारित असा हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे आम्ही तिघेही जण याबद्दल खूप जास्त उत्सुक होतो. ही उत्सुकता आणि शास्त्रीय संगीताच्या प्रेमापोटीच आम्ही हा चित्रपट स्वीकारला.”

अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की, कट्यार.. हा चित्रपट नाटकावर आधारित असला तरी तो नाटकाचं चित्रपटात केलेलं रूपांतर नसून ती एक स्वतंत्र आणि वेगळी कलाकृती आहे त्यामुळे त्याची तुलना नाटकाशी करू नये. चित्रपटात नाटकातील मुळ गाण्यांसोबतच काही नवीन गाण्यांचाही समावेश करण्यात आलाय. जुन्या गाण्यांप्रमाणेच ही नवीन गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील याची मला खात्री आहे.

कट्यार काळजात घुसली’ही कथा जेवढी दोन घराण्यातील संघर्षाची आहे तेवढीच गुरू – शिष्याच्या नात्याची सुद्धा आहे. कट्यार.. चा आकर्षणबिंदू आहे ते या सिनेमाचे संगीत. पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या शब्दांनी सजलेली ‘घेई छंद मकरंद, ‘तेजोनिधी लोह गोल, ‘सुरत पिया की छिन बिसरायी’ ही आणि अशीच इतर लोकप्रिय गाणी. विविध राग, हरकती आणि आवाजातील नजाकतीने सजलेल्या या गाण्यांना संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. ही गाणी त्याच चालीवर पण नव्या आवाजात या चित्रपटामधून ऐकायला मिळणार आहेत. याशिवाय यात ‘दिल की तपीश’, ‘सूर निरागस हो’, ‘मन मंदिरा’, ‘सूर से सजी संगिनी’, ‘भोला भंडारी’ ह्या नवीन गाण्यांचाही समावेश आहे. यातील मूळ गाण्यांचं पुनर्ध्वनिमुद्रण आणि ही नवीन गाणी संगीतबद्ध केली आहेत शंकर-एहसान-लॉय या लोकप्रिय संगीतकार त्रयींनी. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून संगीताचा वारसा लाभलेले महेश काळे,  सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवुडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंग, दिव्य कुमार, सावनी शेंडे आणि पं. वसंतराव देशपांडे यांचे नातु  राहुल देशपांडे अशा मातब्बर गायकांनी ही गाणी गायली आहेत. चित्रपटात शंकर महादेवन यांच्यावर चित्रीत झालेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं ‘सूर निरागस हो’ हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालेलं आहे. चित्रपटात एकूण २० गाणी असून ती लिहिली आहेत, गीतकार प्रकाश कपाडिया, समीर सामंत, मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांनी. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे दिग्दर्शनात तर शंकर महादेवन अभिनयात पदार्पण करीत आहेत. त्याचबरोबर चतुरस्र अभिनेते सचिन पिळगावकर खॉंसाहेबांची अजरामर अशी भूमिका रंगवणार आहेत.

चित्रपटात सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिवाय या चित्रपटाद्वारे हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वर मराठीमध्ये पदार्पण करत आहेत हे विशेष. यावर्षी ‘लोकमान्य – एक युगपुरूष, ‘टाईमपास २, ‘डबलसीट’सारखे सुपरहिट चित्रपट आणि ‘किल्ला’सारखी आशयघन कलाकृती देणा-या एस्सेल व्हिजनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्मस् ने चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर १२ नोव्हेंबरला  झी स्टुडीओज्  ह्या बॅंनरखाली प्रदर्शित होणारा हा चित्रपट सिनेरसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स आता झी स्टुडिओज्

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांची व्याप्ती राज्यात, देशात आणि परदेशातही पोहचविणा-या एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्सने ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. यशाचे अनेक मापदंड निर्माण करणारी ही संस्था आता ‘झी स्टुडिओज्’ या नावाने ओळखली जाणार आहे. याविषयी बोलताना संस्थापक नितीन केणी म्हणाले की, “बदल ही प्रत्येक माध्यमाची गरज आहे. २००४ या वर्षात ‘अल्फा मराठीचं’ ‘झी मराठी’ असं नामकरण झालं. त्यांनंतर सुरू झालेल्या ‘झी टॉकीजच्या’ बॅनरखाली आम्ही अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. ही यशस्वी घोडदौड चालू असताना एका नव्या बॅनरअंतर्गत चित्रपटांची निर्मिती करण्याचा आम्ही विचार केला आणि त्यातूनच ‘एस्सेल व्हिजन’ची स्थापना झाली. गेल्या दोन वर्षांत ‘दुनियादारी’, ‘टाइमपास’, ‘लय भारी’, ‘डबलसीट’ सारख्या चित्रपटांमधून आम्ही बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या नवे विक्रम प्रस्थापित केलेच शिवाय ‘फॅंड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘किल्ला’ सारख्या आशयघन कलाकृतीही दिल्या. मराठी चित्रपटांना वेगळी ओळख प्राप्त करून देण्यात एस्सेल व्हिजनने महत्त्वाची भूमिका पार पाडल्यानंतर आता हा विस्तार आणखी मोठ्या प्रमाणावर करण्याचा आमचा मानस आहे. ही एक नवी सुरूवात झी स्टुडिओज् या नावाने करण्यात येणार आहे. या बॅनरअंतर्गत हिंदीमध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवलेल्या ‘जज्बा’ नंतर इंग्रजीतील ‘विन डिझल’ आणि ‘दि लास्ट विच हंटर’ या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. एक निर्मितीसंस्था ‘स्टुडिओ’ या संकल्पनेतून केवळ देशातच नाही तर परदेशातही कार्यरत व्हावी हाच या पाठीमागचा उद्देश आहे. मराठीमध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ ही झी स्टुडिओज् ची पहिली निर्मिती ठरणार आहे याचा विशेष आनंद आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खुनातील आरोपी उद्धव उर्फ उद्ध्या कांबळेला सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे – २०१६ साली झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या...

ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा :उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १५ जुलै २०२५ : ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा...