पुणे, : जगात एकमेव भारत देशाची राज्यघटना ही सर्वसामान्य लोकांना अर्पण करण्यात आलेली
आहे. सर्वसामान्य नागरिकांना राज्यघटनेमुळे देशाचे मालक बनता आले आहे. या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर त्यांच्या विचारांचा उत्सव झाला पाहिजे, असे मत
ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्री उत्तम कांबळे यांनी आज (दि. 14) व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ
येथे आयोजित कार्यक्रमात श्री. उत्तम कांबळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. प्रभाकर देवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषणचे माजी संचालक श्री.
उत्तमराव झाल्टे, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. निळकंठ वाडेकर व श्री. रामराम मुंडे यांची उपस्थिती होती.
श्री. उत्तम कांबळे म्हणाले, की भगवान गौतम बुद्धांनी दुःखाचे विश्लेषण केले तर डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी अनेक ग्रंथ लिहून त्याची उत्तरे शोधली आहेत. सोबतच राज्यघटनेतून सर्व भारतीयांना समान
मताचा अधिकार, समान मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. डॉ. बाबासाहेबांचे विचार आणखी शेकडो वर्ष जीवंत
ठेवण्याची गरज आहे. हे विचार अंगिकारले नाही तर ते संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या विचारांचा उत्सव होणे आवश्यक असल्याचे श्री. कांबळे म्हणाले.
यावेळी श्री. उत्तमराव झाल्टे यांच्यासह मुख्य अभियंता सर्वश्री निळकंठ वाडेकर, रामराव मुंडे, श्री. प्रभाकर देवरे
यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता श्री. संजीव भोळे यांनी केले तर सूत्रसंचालन
श्री. उद्धव कानडे यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी आभार मानले.
यावेळी महावितरणचे श्री. उद्धव कानडे यांचा श्री. उत्तम कांबळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला
महावितरण व महापारेषणमधील अभियंता, अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व संघटनांच्या संयुक्त समितीने पुढाकार घेतला.