कोल्हापूर : डॉल्बी मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तसेच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना सढळहस्ते मदत करणार, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दल कोल्हापूर शहर अंतर्गत गणराया ऍ़वॉर्ड 2014 बक्षिस वितरण समारंभ शाहू स्मारक येथे झाला. यामध्ये मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर वैशाली डकरे, आ. राजेश क्षिरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चैतन्य एस., यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात गणराया ऍ़वॉर्ड 2014 चे सर्वसाधारण विजेतेपद लेटेस्ट तरुण मंडळ, मंगळवार पेठ यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
उत्सवकाळातील डॉल्बीच्या वापराबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, निर्देशांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी सर्व मंडळांनी घ्यावी. तसेच डॉल्बी मुक्त वातावरणात गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरे करावेत. अशा डॉल्बी वापर न करणाऱ्या मंडळांना त्यांच्या समाज उपयोगी उपक्रमांमध्ये आपण सढळहस्ते मदत करु. मंडळांनी ज्या ठिकाणी 30 टक्क्यांपेक्षा पाऊस कमी आहे अशा ठिकाणी दुष्काळ निवारणासाठी, महिला सक्षमीकरण, सबलीकरण यासाठी सामाज उपयोगी उपक्रम राबवावेत.
गणपती मिरवणूक काळात पोलीस दल अविरतपणे कर्तव्य बजावत असते. त्यांचा माणूस या नात्याने विचार करुन त्यांना चहा, नाष्टा, जेवण यांची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून उत्सवकाळातील अनावश्यक खर्चात बचत करुन मुलींचे शिक्षण व अन्य समाज उपयोगी बाबींवर खर्च होईल यासाठी मंडळांनी प्रयत्न करावेत. गणपती उत्सव काळात दहशतवादी घटनांबाबत अलर्टस् मोठ्याप्रमाणात येत आहेत या साऱ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराने हिंदू-मुस्लीम ऐक्याची प्रदीर्घ परंपरा जपावी, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी गणराया मिरवणूक शांततेत पार पाडावी, असे सांगून गणपतीची उंची कमी करावी. पालखीतून गणपती नेता येईल अशी मुर्ती बसविण्याबाबत विचार करावा, असे आवाहन केले.
महापौर वैशाली डकरे यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडून मंडळांनी जनता व प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.
आ. राजेश क्षिरसागर यांनी आपण डॉल्बीचे समर्थक नाही असे स्पष्ट करुन डॉल्बीच्या दुष्यपरिणांबाबत युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागरणाची आवश्यकता व्यक्त केली. तसेच डॉल्बी मुक्त गणेशोत्सवासाठी सहकार्य करु असे सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा यांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करुन राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, दहशतवादी घटनांबाबत अलर्टस् येत आहेत अशा स्थितीत सर्वांनी डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात सामंजस्याने, शांततेने उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. डॉल्बी मुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांचे प्रबोधन करण्यात येईल, असे सांगून डॉल्बी देणाऱ्या व्यवसायीकांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या वतीने वीज, पाणी, रस्ते यांची चांगली व्यवस्था करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. यावर्षी पासून पोलीस दलाच्या वर्गणीतून गणराया ऍ़वॉर्ड विजेत्या मंडळांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रासोबतच रोख रक्कम देण्यात येईल असे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी पंचगंगा नदीकाठच्या प्रदुषण करणाऱ्या 28 गावांमधून मुर्ती निर्माल्य हे थेट नदीत विसर्जित होणार नाही याची दक्षता यावर्षीही घेण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी कादर मलबारी, निवास साळुखे, उदय गायकवाड, अनिल घारगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक चैतन्य एस. यांनी केले. या कार्यक्रमात उदय गायकवाड, ऍ़ड. केदार मुनिश्वर, अनिल चौगुले, अशोक रोकडे, प्रा. अरुण पाटील या पंच समितीचा सत्कार करण्यात आला.
गणराया ऍ़वॉर्ड सन 2014 स्पर्धा विजेते
सर्वसाधारण विजेतेपद-लेटेस्ट तरुण मंडळ, मंगळवार पेठ
उत्कृष्ट गणेश मुर्ती- प्रथम क्रमांक- न्यु अमर तरुण मंडळ, शनिवार पेठ, द्वितीय क्रमांक- ऋणमुक्तेश्वर तालीममंडळ, शाहू उद्यानसमोर, शुक्रवार पेठ, तृतीय क्रमांक-अष्ट विनायक ग्रुप, पोस्ट गल्ली कॉर्नर, शनिवार पेठ, उत्तेजनार्थ-संघर्ष मित्र मंडळ, आंबे गल्ली, कसबा बावडा. एस.पी.बाईज, हॉटेल निलेश शेजारी, शनिवार पेठ.
उत्कृष्ट देखावा (तांत्रिक)-प्रथम क्रमांक-शाहुपूरी युवक मंडळ, व्यापर पेठ, शाहुपूरी, द्वितीय क्रमांक- जयभवानी तालीम मंडळ, माळी गल्ली, कसबा बावडा, तृतीय क्रमांक-रणझुंजार तरुण मंडळ, परिट गल्ली, शनिवार पेठ, उत्तेजनार्थ-नंदी तरुण मंडळ, रंकाळा चौक.
उत्कृष्ट देखावा (सजिव) प्रथम क्रमांक-छ.शिवाजीराजे तरुण मंडळ, पाटील गल्ली, कसबा बावडा, द्वितीय क्रमांक-मित्र प्रेम तरुण मंडळ, ताराबाई रोड, कपिलतिर्थ मार्केट, तृतीय क्रमांक-उमेश कांदेकर युवा मंच, रंकाळा टॉवर, उत्तेजनार्थ-मनोरंजन तरुण मंडळ, वाडकर गल्ली, कसबा बावडा.
विधायक उपक्रम- प्रथम क्रमांक-प्रिन्स क्लब, मंगळवार पेठ, द्वितीय क्रमांक-सम्राट मित्र मंडळ, चव्हाण गल्ली, कसबा बावडा, तृतीय क्रमांक-जयशिवराय तरुण मंडळ, उद्यमनगर, उत्तेजनार्थ-सर्वोदय मित्र मंडळ, रविवार पेठ.
समाज प्रबोधन-प्रथम क्रमांक-युवक मित्र मंडळ, राजारामपुरी 11 वी गल्ली, द्वितीय क्रमांक-शिंपुगडे तालीम मंडळ, जुना बुधवार पेठ, तृतीय क्रमांक-मृत्युजय मित्र मंडळ, शनिवार पेठ, उत्तेजनार्थ-सोल्जर्स ग्रुप, तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ.
शिस्तबध्द मिरणूक-प्रथम क्रमांक-तुकाराम माळी तालीम मंडळ, मंगळवार पेठ.
डॉल्बी मुक्त वातावरणात उत्सव साजरा करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना सढळहस्ते मदत-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Date: