सातारा (जिमाका): ज्या भागातील पीक वाया गेलेले आहे, अशा भागाचे सर्वेक्षण करुन टंचाई सदृश परिस्थिती जाहीर करण्याची विनंती शासनाला करणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
येथील नियोजन भवनात टंचाईबाबत पालकमंत्री श्री. शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, शंभूराज देसाई, आनंदराव पाटील, मकरंद पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सर्वांचे स्वागत करुन संगणकीय सादरीकरण केले. यात प्रामुख्याने जिल्ह्यात झालेल्या पावसाचा आढावा , खरीप पीक पेरणी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असणारी कामे, पशुसंवर्धन याबाबतच्या माहितीचा समावेश होता. श्री. मुदगल म्हणाले,170 टक्के मका पेरणी झालेली आहे. 120 टक्के बाजरीची पेरणी,200 टक्के सोयाबीन पेरणी झालेली आहे. 3 लाख 9 हजार 735 हेक्टर जिल्ह्यात पेरणी झाली आहे. धोममधील पाणीसाठा वगळता जिल्ह्यातील अन्य धरणांची स्थिती चांगली आहे. खटाव , कोरेगाव , माण , फलटण या तालुक्यांमधील पाणी पातळीत घट आहे. जिल्ह्यामध्ये सध्या 31 टँकर सुरु आहेत. जेथे मागणी आहे तेथे टँकर देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विंधन विहीर, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुरुस्ती तसेच नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती हाती घेतली आहे. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध असून संबंधित विभागाकडे देण्यात आला आहे.
यानंतर उपस्थित सर्वच आमदारांनी चर्चेत सहभागी होत विविध सूचना केल्या. पालकमंत्री श्री. शिवतारे यावेळी म्हणाले, बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर संबंधित पाणीपुरवठा योजना कधी सुरु झाली कधी बंद पडली याचाही अहवाल द्यावा. ज्या भागातील पीक वाया गेले आहे, अशा भागांचा सर्व्हे करुन अशा भागांना टंचाई सदृश परिस्थिती जाहीर करण्याची विनंती शासनाला केली जाईल. त्याचबरोबर सर्व उपसा सिंचन योजनांची वीजबिले टंचाईमधून भरण्यात यावीत. सध्यातरी सातारा जिल्ह्यातील धरणांचा साठा चांगला आहे. पुढील परिस्थीतीमध्ये पावसाने आणखी ओढ दिल्यास टँकर पुरविण्याचे अधिकार तहसिलदार यांना देण्याबाबत विचार केला जाईल. त्याचबरोबर ग्रामसभेचा टँकर मागणीचा ठराव आल्यास सात दिवसात टँकर पुरवला जाईल. डोंगरी भागात छोट्या टँकरने पाणीपुरवठा करण्याचा विचार केला जाईल. दोन अडीच महिने पुरेल इतका चारा सध्या उपलब्ध आहे. तरी कृषी खात्यामार्फत वैरण विकास कार्यक्रम उपलब्ध केला जाईल. त्याचबरोबर वाया जाणारा ऊस चाऱ्यासाठी उपयोगात आणला जाईल. प्रशासनाने अत्यंत चांगले टंचाईबाबत नियोजन केले असून मी समाधानी आहे, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.