जागतिक मातृदिनानिमित्त विश्वमाता फाऊंडेशन, पुणे च्या वतीने भारतातील 51 मातांना ‘आदर्श माता गौरव पुरस्कार -2015’ आज दिनांक 9 मे रोजी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे सायंकाळी पद्मविभूषण डॉ. के. एच्. संचेती (थोर मातृभक्त आणि विश्वविख्यात अस्थिरोग तज्ज्ञ) आणि ना. प्रा. राम शिंदे (गृह राज्यमंत्री, पर्यटन आणि पालकमंत्री, अहमदनगर ) यांच्या हस्ते संपन्न झाला.
ईश्वरचंद गोयल ( ज्येष्ठ समाजसेवक व उद्योगपती, प्रिस्टाईन ग्रुपचे संस्थापक) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी भाग्यश्री दांगट (प्रभाग समितीच्या अध्यक्ष), ज्येष्ठ उद्योगपती नंदकुमार वाळंज , बाळासाहेब बोठे -पाटील ( पत्रकार , अहमदनगर), शिवाजी घाडगे (संस्थांपक अध्यक्ष, विश्वमाता फाऊंडेशन) आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करून ज्या मातांनी आपल्या मुलांना लहानाचे मोठे केले, संस्कार-शिक्षण, आदर्शाचे बाळकडू दिले आणि आज ही मुले समाजामध्ये आदर्शवत सेवाकार्य करीत आहेत अशा मातांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला. आजपर्यंत संस्थेने संपूर्ण जगभरातून निवडक 582 आदर्श मातांचा आणि 121 आदर्श पित्यांचा गौरव केला आहे.