जागतिक “डॉक्टर्स डे’ निमित्त
“बालअंधत्व’ विषयी जनजागृतीपर मार्गदर्शन
पुणे :
“जागतिक डॉक्टर्स डे’च्या निमित्त बाल नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांच्या वतीने “बालअंधत्व : उपचार आणि दिशा’ या विषयी जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. “एक्सिस क्लिनिक’ या नेत्रोपचार केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ.रमेश मूर्ती म्हणाले, “जगातील डोळ्यांचे आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात बाल अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढत जाणारे प्रमाण ही धक्कादायक बाब आहे. जगात दरवर्षी पाच लाख मुलांना अंधत्व येते. आफ्रिका आणि एशियामध्ये 75 टक्के अंध मुले राहतात, तर भारतात 14 लाख अंध मुलांपैकी जवळ-जवळ 50 टक्के मुले योग्य वयात उपचार न झाल्याने अंधत्वाचे बळी पडले आहेत.’
बालअंधत्वाच्या उपचाराविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “बाल अंधत्व हे योग्य उपचाराने टाळता येते. नॉर्मल मुलांनाही दृष्टीदोष असू शकतो परंतु, ही बालके अंधुक दिसते किंवा दिसत नाही असे सांगू शकत नाहीत. त्यामुळे बालकाच्या वयाच्या तिसऱ्या वर्षांपूर्वीच त्यांच्या डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.’