खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी घेतली आयुक्तांबरोबर बैठक -नदीसुरक्षा, स्वच्छता, कचरा प्रश्नावर आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद
पुणे :
महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या नदीसुरक्षा, स्वच्छता, कचरा प्रश्न आणि नागरी प्रश्नांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार, अॅड. वंदना चव्हाण यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याबरोबर बैठक घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, अधिकारी वर्ग उपस्थित होता.
प्रलंबित प्रश्नाबाबतचे पत्र खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी आयुक्तांना दिले. जानेवारी 2015 मध्ये प्रशासनाने स्वच्छतागृहांची स्वच्छता विषयक काम मे महिन्यांपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु नदीपात्रात अतिक्रमण, राडारोडा टाकणे अजून थांबलेले नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमावेत. नदीस्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत.
शहर कंटेनर मुक्त करताना प्रशासनाने कंटेनर हलविले आहेत. मात्र, पर्यायी व्यवस्था केली नाही. 21 प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविताना उर्वरित सर्व प्रभागातील प्रश्नही सोडविणे महत्त्वाचे आहे.
सार्वजनिक भिंतीवर पोस्टर्स लावून शहर विद्रुप केले जात आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणीही खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केली.
बैठकी दरम्यान आयुक्तांनी शहरातील विविध समस्या सोडविण्याबाबत सोयी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामध्ये स्वच्छता गृहांमध्ये 15 मशिन गाड्यांद्वारे यांत्रिक स्वच्छता करण्यात येणार आहे, ही स्वच्छता दोन शिफ्ट्समध्ये केली जाईल. यासाठी एक स्वच्छता समिती तयार करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहात लाईट व्यवस्था, महिला स्वच्छतागृहात महिलांसाठी विविध सोयीसुविधा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शहरातील मोठ्या प्रमाणातील कचरा समस्या यावर उपाय म्हणून प्रभाग अधिकार्यांमध्ये स्पर्धा घेण्यात यावी जेणेकरून कचरा साचण्यावर प्रबंध येतील ही खासदार अॅड. वंदना चव्हाण यांची मागणी आयुक्तांकडून मान्य करण्यात आली.
पर्यटन वाढण्यासाठी पालिकेने स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला पाहिजे. मात्र, अनेक विभाग त्यावर स्वतंत्रपणे काम करीत आहेत. पर्यटन वृद्धी हा एकात्मिकपणे पुढे नेण्याचा उपक्रम आहे. त्यासाठी एक स्वतंत्र बैठक आयोजित करावी असे, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी सुचविले आहे.