कोल्हापूर
‘एसआयटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉम्रेड गोंविदराव पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत, पण राज्य सरकार त्यांची नावे जाहीर करू देत नाही,’ असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. अधिवेशनात या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक भूमिका घेतील. खुन्यांची नावे जाहीर करण्यासाठी सरकारला भाग पाडू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूर महापालिकेतर्फे कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर वैशाली डकरे, उपमहापौर ज्योस्त्ना मेढे, माजी आमदार बाबूराव धारवाडे, डी. बी.पाटील, भाकप राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पानसरेंचे मारेकरी सापडले आहेत, पण सरकारच नावे जाहीर करू देत नाही. हा प्रकार अतिशय गंभीर आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. भालचंद्र कानगो म्हणाले, ‘कॉम्रेड पानसरे यांच्या स्मारक उभारणीत महापालिकेने घेतलेला पुढाकार स्पृहणीय आहे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. सरकारने, मारेकऱ्यांचा खरा चेहरा समाजासमोर आणावा.’ यावेळी कॉम्रेड मेघा पानसरे, चंद्रकांत यादव यांनी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृती जागविल्या. स्थायी सभापती आदिल फरास यांनी स्मारक उभारणीमागील भूमिका विशद केली.